पंढरपूर : वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी आता विठुरायाच्या समीप येत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज म्हणजेच सोमवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्हा प्रशासनाने वारीसाठी तयारी पूर्ण केली आहे. भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या आहेत. आता विठुरायाच्या नगरीजवळ आल्याने भाविकांना दर्शनाची आस लागली आहे.
‘माझ्या जीवाची ग आवडे… पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत शेकडो वर्षांपासून पायी वारीची परंपरा आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरणीची कामे उरकून भाविक पंढरीच्या वारीला निघाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर लाखो भाविक सामील झाले आहेत. सोहळा आता पंढरीसमीप आला आहे.
सोमवारी सकाळी माउलींची पालखी बरड येथून प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. त्या ठिकाणी सोलापूर प्रशासन स्वागत करणार. तर दुसरीकडे सातारा प्रशासन माउलींना निरोप देणार आहे. पुढे माउलींचा पालखी सोहळा सोमवारी नातेपुते येथे मुक्कामी राहणार आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाची भाविकांच्या सोयीसुविधेसाठी तयारी पूर्ण झाली आहे. पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती झाली असून, पालखी तळावर मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सुविधेबरोबर डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच यंदा वॉटर प्रूफिंग आणि जर्मन हँगर पद्धतीचे मंडप उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
तर पालखी मार्ग व तळांवर जिल्हा परिषद मार्फत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्नानगृह, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष, महिला भाविकांसाठी स्वतंत्र स्नानगृह देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या मानाच्या पालखी मार्गावर अधिकारी कर्मचारी सर्व सोयीसुविधेसह सज्ज आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
तर यंदा पहिल्यांदा ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, गर्दीचे ठिकाण, वाहतूक नियंत्रण, तसेच सोहळ्यात किती माणसे आहेत याची मोजमाप केली जाणर आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे. असे असले तरी आषाढी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे एकादशीचा सोहळा रविवारी (दि. ६) होणार आहे. आता पालखी सोहळा पंढरीच्या जवळ आल्याने भाविकांना दर्शनाची आस लागली आहे.