सावंतवाडी:शक्तिपीठ महामार्गामुळे पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील परिसराचे मोठे नुकसान होईल आणि हा महामार्ग प्रामुख्याने खनिज संपत्तीच्या वाहतुकीसाठीच वापरला जाईल, असा आरोप करत शक्तीपीठ महामार्ग राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. काझी शहाबुद्दीन हॉल येथे झालेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत त्यांनी हे प्रतिपादन केले.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती आणि भूमिका
या महत्त्वपूर्ण बैठकीला गिरीश फोंडे यांच्यासह कॉम्रेड. संपत देसाई, ॲड. दिलीप नार्वेकर, शेतकरी संघटनेचे नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, वैश्य समाजाचे प्रसाद पावसकर, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, निमंत्रक डॉ. जयेंद्र परुळेकर, सह निमंत्रक सतीश लळीत आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
गिरीश फोंडे यांचे विचार;
गिरीश फोंडे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन राज्य केल्याचे उदाहरण देत, राज्य सरकारनेही सर्वांना सोबत घेऊन विकास करावा असे सांगितले. त्यांनी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात निसर्गाच्या विरोधात झालेल्या विकासामुळे अतिवृष्टी आणि मोठ्या नुकसानीकडे लक्ष वेधले. मुंबई-गोवा महामार्गाचे २२ वर्षांपासून सुरू असलेले काम पूर्ण होत नसताना, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आंबोली आणि गेळे सारख्या दऱ्याखोऱ्यातून बोगदे कसे तयार करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “कोकणवासीयांच्या डोळ्यातून शक्तीपीठ महामार्ग पाहिला तर अनेक संकटे उभी राहतील,” असे ते म्हणाले.
आंबोली ते मांगेली या परिसरातील आठ वाघांच्या उपस्थितीचा उल्लेख करत, वन्यजीव आणि मानवाचा संघर्ष या मार्गामुळे वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नागपूर-रत्नागिरी महामार्गाची रुंदी वाढवण्याऐवजी नव्या महामार्गाची गरज काय, असा प्रश्न त्यांनी केला. कोल्हापूर विमानतळावरील कथित शेतकरी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली, ते शेतकरी नसून राजकीय खेळी असल्याचे म्हटले. त्यांनी ब्रिटिशकालीन कायद्यांसारख्या कार्यपद्धतीची भीती व्यक्त केली आणि महामार्गासाठी अद्याप कोणताही मोबदला जाहीर न झाल्याने सरकार आणि कंत्राटदारांची युती असल्याचा आरोप केला. सह्याद्रीच्या खोऱ्यातून खनिज संपत्ती वाहून नेण्यासाठीच हा महामार्ग तयार केला जात असून, निसर्ग ओरबाडून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे मत:
डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी “आम्ही शक्तीपीठ महामार्ग मागितला नाही” असे स्पष्ट केले आणि धमक्या देणाऱ्यांना लोकशाहीची आठवण करून दिली. त्यांनी १३ ही गावांमध्ये जाऊन लोकांना जागृत करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी पर्यटन, जैवविविधता, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ पशुपक्षी असलेल्या पश्चिम घाटासारख्या हॉटस्पॉटची वाताहत कशी करणार, असा प्रश्न उपस्थित केला. ३८ किलोमीटरचा हा रस्ता भुईभागातून जाणार असल्याचे सांगितले जात असले तरी, भूसंपादन अधिकारी लोकांना फसवित असल्याचा आरोप त्यांनी केला. या महामार्गामुळे होणारे धोके, नुकसान आणि नैसर्गिक आपत्ती यावर सर्वेक्षण होण्याची मागणी त्यांनी केली.
वसंत उर्फ अण्णा केसरकर (शेतकरी संघटनेचे नेते): शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकार करत असून, काजूच्या नुकसानीला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘जेलभरो’ आंदोलनाची तयारी दर्शवली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.बाबुराव धुरी (ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख): लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महामार्ग जाणाऱ्या गावात पोहोचणे महत्त्वाचे आहे. काहीजण कामाच्या आमिषाने समर्थन करत असून, याविरोधात जनजागृती कार्यक्रम गावागावात राबवण्याची गरज आहे.इर्शाद शेख (काँग्रेस जिल्हाध्यक्ष): शक्तीपीठ महामार्ग लादला जात असून, जैवविविधता, पशु-पक्षी आणि औषधी वनस्पती नष्ट होतील. मुंबई-गोवा आणि संकेश्वर-बांदा हे दोन रस्ते प्रथम पूर्ण करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
सत्ताधारी पक्षाचे सरपंच शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सतीश लळीत (सह निमंत्रक): विकासाला विरोध नसला तरी, शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही कारण नागपूर-रत्नागिरी हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. घाटमार्गाकडे लक्ष देऊन करूळ आणि फोंडा घाटरस्त्यांची सुधारणा करावी, असे ते म्हणाले. इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये वृक्षतोड कशी केली जाईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.कॉम्रेड संपत देसाई: राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारी आंदोलने सुरू झाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आंदोलनाला पाठबळ मिळायला हवे.
या बैठकीला के.डी. पाटील, मायकल डिसोझा, रमेश गावकर, संदीप सुकी, विभावरी सुकी, समीर वंजारी, रवींद्र म्हापसेकर, प्रा. नंदीहल्ली, महेंद्र सांगेलकर, संजय लाड, काका भिसे, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, निशांत तोरसकर, संदीप आईर, सत्यवान आईर, प्रशांत बुगडे, अशोक धुरी, विलास सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संघर्ष समितीने या महामार्गाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, येत्या काळात तीव्र आंदोलनाची शक्यता आहे.