कराड : भाजपचा मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच आरक्षण मान्य नाही, मग त्यांच्याकडून त्यासाठी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. हे सरकार एकाच्या पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्याला खोटे आश्वासन देत वाऱ्यावर सोडून केवळ बनवाबनवी करत आहे. दोन समाजांना आमने- सामने आणत संघर्ष पेटवून समाजात विष पेरत असल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोडले.
कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ओबीसी शाखेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम समाजातर्फे वडेट्टीवार यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजप व महायुती सरकारकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असून, त्याचा सर्वाधिक फटका इतर मागास समाजाला बसणार आहे. सरकारने काढलेला आदेश (जीआर) हा मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे. कुणबी दाखल्याला आमचा विरोध नाही. मात्र, इतर मागास समाजानेच आता खुल्या प्रवर्गात येणे हेच त्यांच्या फायद्याचे ठरेल, त्यासाठी त्यांना आपण तसे आवाहन करणार असल्याचे उपहासात्मक विधान वडेट्टीवार यांनी केले.
राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, अतिवृष्टीची मदत, अपेक्षित आधार दिला जात नाही. लाडक्या बहिणींना दोन महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. ठेकेदारांची देयकेही थकल्याने त्यांच्याही आत्महत्या सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडला जाईल, अशी टीका करताना मात्र जनतेने त्याला भुलू नये, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
माध्यमांवर नाराजी
बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस रस्त्यावर आहे. पण, माध्यमांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी त्यांनी एका प्रश्नावर बोलताना उघड केली. नागपूर, भंडारा, अमरावतीत मोठे मोर्चे निघाले. पण, उद्योगपतींच्या हातात गेलेल्या माध्यमांकडून त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. राहुल गांधींनी मतचोरीचा प्रश्न उपस्थित केला, त्याला पंतप्रधान उत्तर देत नसल्याची खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
महायुतीत संघर्ष
‘महायुती’ हे मतांची चोरी करून सत्तेत आलेले सरकार. त्यांचे महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे कसलेही लक्ष नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. राज्यात शिंदे- फडणवीस यांच्यातील संघर्ष उघड होत असून, शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ‘महायुती’तील तिघे सत्तेतील वाट्यासाठी सतत भांडत असल्याचीही टीका वडेट्टीवार यांनी केली.