बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. अनेक कलाकारांनी घराणेशाही या वादावर वक्तव्य केले. आता बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला देखील घराणेशाहीचा अनुभव आल्याचे त्याने सांगितले आहे.
अक्षय कुमारने ‘मिड डे’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने ‘फूल और कांटे’ या चित्रपटाच्या वेळचा अनुभव सांगितला आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी अक्षय कुमारची निवड करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव या चित्रपटातून अक्षयला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याच्या जागी अभिनेता अजय देवगणला घेण्यात आले होते. अजयने या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. अजय हा बॉलिवूडचे स्टंटमॅन वीरु देवगन यांचा मुलगा होता आणि अक्षय कुमार दिल्लीहून आलेला आउटसायडर होता. त्यामुळे अक्षयच्या जागी अजय देवगणला घेतल्याचे म्हटले जात आहे.
1991 साली ‘फूल और कांटे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘फूल और कांटे चित्रपटातील गाण्याच्या मेकिंगमध्ये, फोटोशूटमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये मी सहभागी झालो होतो. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या एक दिवस आधी रात्री मला फोन आला. त्यावेळी मी दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या सेटवर जायचे म्हणून तयारी करत होतो. मला फोन आला आणि चित्रपटात माझ्या जागी दुसरं कोणाला तरी रिप्लेस करण्यात आले आहे असे सांगण्याते आले’ असे अक्षयने म्हटले.
आता अक्षय आणि अजयमध्ये कोणताही वाद नाही. ते दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.