अभिनेता मनोज वाजपेयीची वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीजनची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. ४ जून रोजी रिलीज होणारी ही सीरिज ३ जूनच्या मध्यरात्रीच रिलीज करण्यात आली. प्रेक्षकांनी या सीरिजला तुफान प्रतिसाद दिलाय. चाहत्यांकडून मिळत असलेलं प्रेम आणि प्रतिक्रिया पाहून अभिनेता मनोज वाजपेयी भावूक झालाय. यावेळी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार देखील मानले.

अभिनेता मनोज वाजपेयी याने त्याच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय. सुपरहिट ठरलेल्या ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीजनमधला हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “माहित नाही किती आणि कोणत्या शब्दांमध्ये मी तुमच्या सर्वाचे आभार मानू…तुम्हा सर्वांचं प्रेम पाहून मी तुमचा किती आभारी आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही…तरीही तुम्ही सर्वांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यासाठी मनापासून सर्वांचे धन्यवाद !” अभिनेता मनोज वाजपेयी याने भावूक होत लिहिलेली ही पोस्ट प्रेक्षकांच्याही मनात बसली आणि ते सुद्धा भावूक होत त्याच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसून आले.

एका युजरने लिहिलं, “प्रिय मनोज जी… हे खूप छान आहे…तुमच्या येण्याने स्क्रीनवर प्रत्येक वेळी एक वेगळीच चमक दिसून येते…प्रत्येकानेच खूप चांगलं काम केलंय…पण तुम्ही तर त्यांच्यापेक्षा खूप वेगळेच आहात.”

राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजमध्ये एका मध्यमवर्गीय श्रीकांत तिवारीची कहाणी सांगण्यात आलीय. यात श्रीकांत तिवारी धोकादायक असलेली पोलिसाची नोकरी आणि आपल्या कुटूंबात समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतो. या श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत अभिनेता मनोज वाजपेयी झळकलाय. या सीरिजच्या यंदाच्या सीजनमध्ये साऊथची सुपरस्‍टार समांथा अक्‍कीनेनी सुद्धा दिसून आली. याच सीरिजचा पहिला सीजन सुपरहिट ठरला होता.

मनोज वाजपेयीची ‘द फॅमिली मॅन २’ ही सीरिज रिलीज होण्यापूर्वीच काही वादांच्या भोवऱ्यात सापडली होती. राज्यसभेचे खासदार वायको यांनी सीरिज बंद करण्याबाबत सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं होतं. खासदार वायको यांच्या म्हणण्यानुसार या सीरिजमध्ये तामिळ समूहाला दहशतवाही संघटनेप्रमाणे दाखवण्यात आलं. तमिळ अभिनेत्री समांथा अक्‍कीनेनी हिला पाकिस्तानशी कनेक्शन असलेली आतंकवादी दाखवण्यात आली आहे. यामुळे तमिळीयन्सच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणूनच तमिळ लोकांनी या सीरिजला विरोध करण्यास सुरवात केली होती.