बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झालं. १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असं पोलिसांनी प्राथमिक अंदाजात सांगितलं होतं. परंतु त्या दिवसापासून ते आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, असं असलं तरी सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला ? याचं कोडं आजही उलगडू शकलं नाही. या प्रकरणात एनसीबीने तब्बल ५२ हजार पानी चार्जशीट दाखल केली. यात रिया आणि शौविकसह इतर ३३ जणांच्या नावांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. मात्र आजही महत्त्वाचे चार प्रश्न अजून अनुत्तरीतच आहेत.

 

पाटणामध्ये FIR दाखल करण्याचा सल्ला कुणी दिला ?

सुशांतच्या मृत्यूच्या दीड महिन्यानंतर २५ जून २०२० रोजी सुशांतचे वडील केके सिंह यांनी त्यांच्या मूळ गावी पाटणा इथे रिया चक्रवर्तीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय. पाटणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार रियाने सुशांतच्या बँक खात्यातून सुमारे १५ कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली एफआयआर पाटण्याहून मुंबईत सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांना दूर ठेवण्यासाठी मुळचा उत्तर प्रदेशचाच असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने पाटणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला होता. या आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या या सल्ल्यामुळे त्याला नंतर मुंबई पोलिसातील वरिष्ठांकडून वैमनस्याचा सामना करावा लागला होता. सीबीआयने अद्याप या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव जाहीर केलं नाही.

 

सुशांत प्रकरणावर सीबीआय गप्प का?

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात तपास करण्यासाठी मुंबई पोलीस, बिहार पोलीस, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि अंमलबजावणी संचलनालय (ED) यांच्यासोबतच देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती सीबीआय (CBI) या पाच यंत्रणांनी सुशांत मृत्यूप्रकरणाची चौकशी केली. तरीही सुशांतच्या मृत्यूबाबत जे प्रश्न एका वर्षापूर्वी निर्माण झाले होते तेच आजही कायम आहेत. एनसीबीने रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक केली. सोबतच सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पण अजुन तरी सीबीआयने तपासाचा निकाल जाहीर केला नाही. तसंच सुशांतने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अहवाल देणाऱ्या एम्सच्या डॉक्टरांच्या टीमचा देखील शोध घेऊ शकले नाहीत.

 

सुशांतच्या बहिणी विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचं काय होणार ?

रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहिण प्रियांका सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. डॉक्टरांची औषधांची चिट्ठी नसताना औषध देणं याबाबत हा गुन्हा दाखल केला होता. सुशांतची बहिण प्रियांकाने एप्रिल २०२० मध्ये त्याला व्हॉट्सअॅपवर काही औषधांची यादी पाठवली होती. ही औषधं तिने दिल्लीचे डॉक्टर तरूण कुमार यांच्या सल्ल्यानेच पाठवली होती. सुशांतला एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी घातलेली औषधे दिली गेली होती आणि त्यामुळे सुशांतचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, असा आरोप देखील रियाने केलाय.

११ फेब्रूवारी २०२१ रोजी मुंबई हायकोर्टाने प्रियांका सिंहविरोधात खटला सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मुंबई पोलिसांना प्रियांकाची चौकशी करण्यासाठीचा मार्ग मोकळा झालाय. परंतू या खटल्याचं पुढे जाऊन काय होणार, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. प्रियांका सिंहचे पती सिद्धार्थ तंवर हे एक वरिष्ठ वकिल आहेत.

आणखी वाचा: सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण; अंकिता म्हणाली, “अंतराने काही फरक पडत नाही, कारण एक दिवस….”

एनसीबीची कारवाई फक्त ड्रग्ज वितरक आणि छोट्या ग्राहकांसाठीच होती का?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणाऱ्या एनसीबीने पेज थ्री सेलिब्रिटींशी संबंधीत बड्या ड्रग्ज वितरकांचे अटक सत्र सुरू केले होते. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह या बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत रिया चक्रवर्ती , शौविक चक्रवर्ती , सॅम्युअल मिरांडा यांना अटक झाली होती. मात्र, यातील बडा मासा एनसीबीच्या गळाला लागलेला नाही. त्यांच्या कारवाया केवळ ड्रग्ज वितरक आणि छोट्या ग्राहकांपर्यंतच पोहोचू शकल्या. बॉलिवूडमधून कोणत्याच मोठ्या सेलिब्रिटींवरील आरोपांबाबत किंवा ड्रग्ज रॅकेटबाबत कोणतीही ठोस माहिती एनसीबी देऊ शकली नाही.