Aamir Khan Talks About ShahruKh Khan : बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा नुकताच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून तो मुख्य भूमिकेत झळकत आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळतोय. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिर खानने अनेक मुलाखती दिल्या. यावेळी अभिनेत्याने अनेक किस्से सांगितले.
आमिर खानने नुकतीच ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याने शाहरुख खानबरोबरच्या मैत्रीबद्दल वक्तव्य केलं आहे. आमिर खान जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाला, “पूर्वी मी शाहरुखला फार ओळखायचो नाही. आम्ही खूपदा एकमेकांच्या घरी भेटायचो, एकत्र फिरायचो. तो मला नेहमी मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही यावरून चिडवायचा”.
माध्यमांच्या माहितीनुसार शाहरुख खाननं एकदा आमिरला छिछोरा, असं म्हटलं होतं. परंतु, यावर आमिरनं “तो एक हुशार व्यक्ती आहे. जर त्याला मी छिछोरा वाटत असेल, तर त्यावर मी काय बोलणार. ते त्याचं मत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती. शाहरुख खान व आमिर खान यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत.
आमिर खानने या मुलाखतीमध्ये असंही सांगितलं, “शाहरुख खान, सलमान खान आम्ही अनेकदा भेटण्यासाठी प्लॅन बनवत असतो. जेव्हा भेटतो तेव्हा खूप मजा करतो: पण तेव्हा जर आम्ही दारू प्यायला सुरू केली, तर रात्रभर प्यायचो. सकाळी ७ पर्यंत थांबत नसू. आमचं स्वत:वर नियंत्रण नसायचं, असं आम्ही निदान १० वेळा तरी केलं आहे”.
आमिर खान व सलमान खान यांनी एकत्र ‘अंदाज अपना अपना’ या १९९४ साली आलेल्या चित्रपटातून एकत्र काम केलं होतं. परंतु, यानंतर हे दोघे अजून कुठल्याही नवीन चित्रपटात एकत्र काम करताना दिसले नाहीत. आमिर खाननं नुकतंच वक्तव्य केलं होतं की, तो,शाहरुख व सलमान यांनी त्यांना एकदा तरी एकत्र काम करायचं आहे, असं ठरवलं आहे. तर ते तिघे चांगल्या संहितेच्या शोधात असल्याचंही अभिनेत्यानं म्हटलं होतं.