गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या या सीरिजमधील पहिला भाग प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाने चांगली कमाई केली. पण दुसरीकडे या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. चित्रपटाच्या कमाईवरुन बरेच वाद रंगले, तसेच चित्रपटातील कलाकारांच्या कामावरूनही त्यांची खिल्ली उडवण्यात आली. प्रामुख्याने आलिया भट्टला प्रेक्षकांनी ट्रोल केले. त्यापेक्षा अभिनेत्री मौनी रॉयने चांगली भूमिका बजावली असे अनेकांनी म्हटले. अखेर मौनीने आलिया आणि तिच्यात होणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : दीपिका पदुकोणने सांगितले हॉलिवूडमध्ये काम न करण्याचे कारण, नेटकरी म्हणाले, “हिचे रडगाणे…”

या चित्रपटात मौनीने ‘जूनून’ ही व्यक्तीरेखा साकारली होती. प्रेक्षकांकडून होणाऱ्या तुलनेवर मौनी म्हणाली, “मला यात काहीही जास्त किंवा कमी महत्त्वाचे वाटत नाही. मला एवढंच वाटतं मी साकारलेल्या जुनून या पात्राकडे आत्मविश्वास आणि शक्ती असल्यामुळे प्रेक्षकांना तसे वाटले असावे. प्रेक्षकांकडून अशा प्रतिक्रिया मिळतील हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. या चित्रपटातील माझी भूमिका ही केवळ माझीच होती. चित्रपटात मला नकारात्मक भूमिका करायची होती आणि ती माझी जबाबदारी होती. मी फक्त माझ्या भूमिकेवरच लक्ष केंद्रित केलं. प्रेक्षकांचा प्रतिसाद ऐकल्यानतंर खूप छान वाटतंय.”

पुढे तिने सांगितलं, “मला माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीच चीज झाल्यासारखं वाटतंय आणि हे खात्रीने सांगू शकते. ब्रह्मास्त्र हा सर्वांचा चित्रपट आहे. अयानने एक जग निर्माण केले आहे. ही हिरोज् आणि व्हीएफएक्सची गोष्ट आहे. यात सर्वच कलाकारांचे पात्र खूप महत्वाचे आहे. आज या चित्रपटाने जे यश मिळविले आहे ते सर्वांच्या मेहनतीने. त्यामुळे या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांपैकी कोणाचाही सहभाग आपण दुर्लक्षित करू शकत नाही.”

हेही वाचा : Photos: ‘असा’ पार पडला आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, बघा अनसिन फोटो

अयान मुखर्जीच्या अस्त्रवर्समधील दुसरा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’ २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यामध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये ‘अमृता’ हे महत्त्वपूर्ण पात्र अभिनेत्री दीपिका पदुकोण साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय ‘देव’ हे पात्र कोण साकारणार आहे या प्रश्नावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.