बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान हा आपल्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतो. मात्र, आता बिश्नोई गँगवर केलेल्या वक्तव्यामुळे तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.
काय म्हणाला सलमान खान?
पीटीआय (PTI)च्या रिपोर्टनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार्जशीट फाइल केली होती. त्यावेळी सलमान खानने स्टेटमेंटमध्ये त्याच्या घरावरील गोळीबाराला लॉरेन्स बिश्नोई गँग जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पुढे तो म्हणतो, “१४ एप्रिलला झोपेत असताना फायरक्रॅकरसारखा आवाज ऐकला. हा हल्ला मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्यासाठी केला गेला होता. त्याच्या बॉडीगार्डने त्याला ४:५५ वाजता मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी पहिल्या मजल्यावर गोळ्या झाडल्याची माहिती दिली होती. त्याआधीही मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या बॉडीगार्डने वांद्रे पोलिस ठाण्यावर याची तक्रार दाखल केली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे फेसबुकवरून समजले होते. गेल्या काही वर्षांत अनेकदा मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की, लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या गँगमधील लोकांच्या मदतीने माझे कुटुंब जेव्हा झोपलेले होते, तेव्हा घरावर गोळीबार केला. मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.”
२०२२ मध्ये सलमानला धमकीचे पत्र सापडले होते. मार्च २०२३ मध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकीचा मेल आला होता. जानेवारी २०२४ मध्ये त्याच्या पनवेलजवळील फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात लोकांनी ओळख बदलून प्रवेश केला होता.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी गोळीबारप्रकरणी १७३५ पानांचे आरोपपत्र महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालयासमोर दाखल केले. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींविरुद्ध कारवाई करण्याइतपत पुरावे असल्याचे नमूद करीत न्यायालयाने दाखल केले गेलेले हे आरोपपत्र नुकतेच मान्य केले असल्याचेदेखील सलमानने म्हटले आहे. विक्कीकुमार गुप्ता, सागरकुमार पाल, सोनूकुमार बिश्नोई, अनुजकुमार थापन, मोहम्मद रफिक चौधरी व हरपाल सिंग अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.