scorecardresearch

“शाहरुख खान अपयशी…” अनुभव सिन्हा यांनी सांगितलं ‘रा.वन’ चित्रपट फ्लॉप होण्यामागील कारण

या चित्रपटासाठी शाहरुख आणि त्याच्या ‘रेड चिलीज’ कंपनीने प्रचंड मेहनत घेतली होती

anubhav sinha about ra one
फोटो : इंडियन एक्सप्रेस

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत ट्रोलर्सची तोंडं बंद केली. तब्बल ४ वर्षांनी कमबॅक करणारा शाहरुख यावेळीही फ्लॉप होणार अशी चिन्ह दिसत असतानाच ‘पठाण’ने रचलेला बघून कित्येक टीकाकार निशब्द झाले. २०११ साली आलेल्या ‘रा. वन’ चित्रपटाच्या दरम्यानही हेच पाहायला मिळालं होतं. याविषयी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी खुलासा केला आहे.

२०११ साली प्रदर्शित झालेला ‘रा.वन’ हा चित्रपट शाहरुखचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. यासाठी शाहरुख आणि त्याच्या रेड चिलीज कंपनीने प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं होतं. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. या चित्रपटाच्या अपयशाबद्दलच अनुभव सिन्हा यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “माझ्यामते तसं काहीच…” दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्याबद्दल मुकेश छाबरा यांचा मोठा खुलासा

एका मध्यमाशी संवाद साधताना अनुभव सिन्हा म्हणाले, “आज ‘रा.वन’ हा चित्रपट हीट वाटतो, पण त्यावेळी याला फ्लॉप म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हा तो काळ होता जेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला वाटत होतं की शाहरुख खानने अपयशी व्हावं, कारण तो चित्रपट त्यांच्या पचनी पडणाराच नव्हता. त्यानंतर ‘तुम बिन २’सुद्धा फ्लॉप ठरला आणि त्यानंतर मी वेगळ्या धाटणीचे चित्रपट करायचं ठरवलं, याचवेळी देशाच्या राजकीय पटलावरही बरीच उलथापालथ सुरू होती.”

‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून रोखठोक वास्तव आशय-विषयाची मांडणी करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे आगामी ‘भीड’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. चित्रपटात राजकुमार राव हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि भूमी पेडणेकर, दिया मिर्झा यांचीही यात मुख्य भूमिका आहे. याबरोबरच पंकज कपूर, आशुतोष राणा, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट २४ मार्चला देशभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 10:03 IST

संबंधित बातम्या