Priya Sachdev comment on Sunjay Kapur-Karisma Kapoor Marriage : उद्योजक व अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले. घशात मधमाशी अडकल्याने पोलो सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत प्रियाने संजय व करिश्माची मुलं समायरा कपूर आणि कियान कपूर यांच्याशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
किन अँड काइंडनेस या युट्यूब चॅनलला प्रियाने मुलाखत दिली होती. मुलाखतीत प्रियाने संजय व करिश्मा यांच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. तसेच संजय करिश्मासाठी दिल्लीहून मुंबईला वारंवार प्रवास करायचे, कारण ती व मुलं मुंबईत राहत राहत होती, असं सांगितलं होतं. प्रिया व संजय यांची भेट विमान प्रवासातच झाली होती. त्यांची मैत्री झाली आणि संजय व करिश्माचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं.
“संजयचे आधीचे लग्न कोणत्याही पारंपरिक लग्नासारखे नव्हते. त्या लग्नातून त्याला दोन सुंदर मुलं आहेत. आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि आता आम्ही एकत्र एक सुंदर कुटुंब आहोत,” असं प्रिया म्हणाली होती.
प्रियाच्या पहिल्या पतीपासूनच्या लेकीबद्दल संजय कपूर काय म्हणाले होते?
प्रियाला तिच्या पहिल्या लग्नापासून सफिरा नावाची मुलगी आहे. ती प्रिया व संजयबरोबर राहायची. “सफिराचं आमच्याबरोबर राहणं सोपं नव्हतं, कारण तो मला म्हणायची की हे माझं घर आहे आणि माझ्या घराचे काही नियम आहेत. सफिराला इथे राहायचं असेल तर हे नियम तिने पाळलेच पाहिजेत. मग मी त्याला तिच्याशी थेट बोलायला सांगितलं. नंतर दोघांचं एक सुंदर नातं तयार झालं. ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत,” असं प्रियाने म्हटलं होतं.
सर्वजण एकमेकांवर खूप प्रेम करतो – प्रिया
“आम्हाला चार मुलं आहेत. सर्वात मोठी समायरा, नंतर सफिरा, कियान आणि माझा आणि संजयचा मुलगा अझारियस. आमचं एक मिश्र कुटुंब आहे,” असं प्रिया म्हणाली होती. करिश्माच्या मुलांशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल प्रियाने प्रतिक्रिया दिली होती. “जेव्हा माझा मुलगा अझारियसचा जन्म झाला तेव्हा तो आमच्यातील एक दुवा होता. कारण तो त्यांचा भाऊ होता. तसेच सफिरा त्यांची बहीण होती. आमच्या दोन्ही मुली समायरा आणि सफिरा एकमेकींच्या खूप जवळ आहेत. आम्ही सर्वजण एकमेकांवर खूप प्रेम करतो,” असं प्रियाने म्हटलं होतं.
“मी कधीच त्यांची आई होऊ शकत नाही, पण मला माहीत आहे की त्यांच्या आयुष्यात आणि मनात माझी जागा आहे. आम्ही मजेदार, फालतू आणि गंभीर अशा सर्वच गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलतो. माझं त्यांच्याशी एक छान नातं आहे,” असं प्रिया संजय व करिश्माच्या मुलांबद्दल म्हणाली होती.
या मुलाखतीत प्रियाने संजय कपूर यांना पोलो खेळाची किती आवड आहे, त्याबद्दलही सांगितलं होतं. ते प्रोफेशनल पोलो खेळाडू आहेत आणि खेळासाठी ते कुटुंबाला घेऊन काही काळ इंग्लंडमध्ये राहतात, असा खुलासा प्रियाने संजयबद्दल केला होता.