उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. मार्च महिन्यात जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा भव्य प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटीजसह जगभरातील अनेक बड्या मंडळींनी हजेरी लावली होती.

अनंत-राधिका जुलैमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. परंतु, जामनगर येथील प्री-वेडिंग सोहळ्यानंतर आता दुसऱ्यांदा अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. हा तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला ८०० पाहुण्यांना आमंत्रित केलं असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… जान्हवी कपूरने मराठमोळ्या ऋतुजा बागवेच्या नव्या मालिकेचा प्रोमो केला शेअर; जाणून घ्या कनेक्शन

अनंत-राधिकाच्या या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बॉलीवूड सिनेसृष्टीतले अनेक कलाकार आज (२७ मे रोजी) इटलीच्या दिशेने जायला निघाले आहेत. आज विमानतळावर पहिल्यांदाच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि त्यांची मुलगी राहा यांना पापाराझींनी पाहिलं. आता मागोमाग मुंबईतील कलिना येथील खाजगी विमानतळावर इतर अनेक सेलिब्रेटीदेखील या सोहळ्याचा भाग होण्यासाठी आलेले दिसत आहेत.

हेही वाचा… आलिया भट्ट लेक राहाबरोबर घालवतेय ‘असा’ वेळ; अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिकादेखील तिच्या कुटुंबाबरोबर प्री-वेडिंग सोहळ्याला जाण्यासाठी निघाली. तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानीदेखील इटलीच्या दिशेने जायला निघाले आहेत.

लोकप्रिय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, त्याची पत्नी साक्षी आणि मुलीबरोबर विमानतळावर दिसला. धोनीने स्मितहास्य करत पापाराझींना हॅलोदेखील म्हटलं. भाईजान सलमान खानदेखील प्री-वेडिंगला जाण्यासाठी विमानतळावर दिसला.

अनेक सेलिब्रिटीज आज इटलीच्या दिशेने निघाले आहेत. यात सुपरस्टार रणवीर सिंगदेखील सामील आहे. रणवीर त्याच्या स्वॅग स्टाईलमध्ये विमानतळावर पोहोचला. पण, यावेळी मात्र तो एकटाच दिसला; दीपिका त्याच्याबरोबर दिसली नाही. रणवीरने एअरपोर्ट लूकसाठी काळ्या रंगाची ट्रॅक पँट, त्याला मॅचिंग जॅकेट, सफेद रंगाचे टी-शर्ट घातले होते. रणवीरने हॅट आणि सनग्लासेसदेखील वापरले होते.

अनंत आणि राधिकाचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन २८ ते ३० मेदरम्यान क्रूझवर होणार आहे. ही लक्झरी क्रूझ इटलीपासून फ्रान्सच्या दक्षिणेकडे जाणार आहे. या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड इंडस्ट्रीमधील काही निवडक सेलिब्रिटी दिसणार आहेत.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

दरम्यान, अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा राजस्थानमधील नाथद्वारा येथे पार पडला. अत्यंत जवळच्या मित्र-परिवारासमवेत त्यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील त्यांच्या घरी अँटिलिया येथे एंगेजमेंट पार्टी ठेवली होती. आता लवकरच मुंबईमध्ये अनंत आणि राधिकाचा भव्य लग्नसोहळा पार पडणार आहे.