Actor Shefali Jariwala passes away at 42 : ‘बिग बॉस १३’ फेम लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यावेळी तिच्यासह तिचे पती पराग त्यागी देखील उपस्थित होते.
शेफाली जरीवालाच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. तिला सर्वत्र ‘कांता लगा गर्ल’ म्हणून देखील ओळखलं जायचं. ‘कांता लगा’ गाण्यामुळे शेफालीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती.
शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट…
शेफाली जरीवालाने तीन दिवसांपूर्वी शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. शेफालीने अलीकडेच ग्लॅमरस फोटोशूट केलं होतं. या फोटोशूट दरम्यानचे ६ फोटो तिने तीन दिवसांपूर्वी इन्टाग्रामवर शेअर केले होते. हीच अभिनेत्रीची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट ठरली आहे. या पोस्टला शेफालीने “Bling it on baby” असं कॅप्शन दिलं होतं.
शेफालीच्या या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या पोस्टवर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, शेफाली जरीवालाबद्दल सांगायचं झालं, तर तिचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. अभिनेत्रीने आजवर अनेक शोज, चित्रपट तसेच गाण्यांच्या अल्बममध्ये काम केलेलं आहे. ‘नच बलिए’ कार्यक्रमात देखील शेफालीने सहभाग घेतला होता. तर ‘बिग बॉस १३’ मध्ये अभिनेत्री स्पर्धक म्हणून झळकली होती. २००४ मध्ये शेफालीचं पहिलं लग्न संगीतकार हरमीत सिंग याच्याशी झालं होतं. या दोघांचा २००९ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने २०१५ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं.