Real Story Of Mrs. Chatterjee Vs Norway: अभिनेत्री राणी मुखर्जी नव्वदीच्या दशकातली टॉपची अभिनेत्री होती. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्याशी तिने विवाह केला. मुलीच्या जन्मानंतर काही वर्षांसाठी राणीने बॉलिवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने मर्दानी चित्रपटासह पुन्हा कमबॅक केले. नुकताच तिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमुळे राणी मुखर्जी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाची कथा नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका भारतीय जोडप्यावर आधारित आहे. युरोपमधील देशांमध्ये पालकांना मुलांचे नीट संगोपन करण्यास सक्षम नसल्यास त्या मुलांना सरकारच्या बाल कल्याण विभागाकडे देण्यात येते. या विभागातर्फ ठराविक वर्षांपर्यंत त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली जाते. पालकांकडून बळजबरीने त्यांची मुले हिसकावून फॉस्टर केअरमध्ये पाठवण्याचे प्रकार तेथील काही देशांमध्ये सुरु आहेत. अशाच एका प्रकारणावर राणी मुखर्जीचा हा चित्रपट आधारलेला आहे.

जाणून घ्या खऱ्या आयुष्यातील मिसेस चॅटर्जींने केलेल्या संघर्षाची कहाणी

२०११ मध्ये अनुरुप भट्टाचार्य कामाच्या निमित्ताने पत्नी सागरिका आणि दोन लहान मुलांसह नॉर्वेला स्थायिक झाले होते. तेव्हा त्यांची मुलगी ऐश्वर्या एका वर्षांची,तर मुलगा अभिज्ञान ३ वर्षांचा होता. नॉर्वेमधील बाल कल्याण विभागाने त्यांच्या मुलांना फॉस्टर केअरमध्ये देण्यासाठी दबाव टाकला. तेथील अधिकाऱ्यांनी सागरिका मुलांना मारतात, मुलांना राहायला घरात जागा अपुरी पडते असे अनेक आरोप केले. मुलांना कपडे, खेळणी देण्याइतपत ही भट्टाचार्य जोडपं असक्षम आहेत असे म्हटले.

Video : “मी चांगली आई की वाईट…” राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ ट्रेलर प्रदर्शित, पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बाल कल्याण विभागाने ऐश्वर्या आणि अभिज्ञान यांचा ताबा फॉस्टर केअर सेंटरकडे देण्याचा आदेश दिला. यामुळे सागरिका-अनुरुप त्यांना वयवर्ष १८ होईपर्यंत भेटू शकणार नव्हते. मुलांचा ताबा मिळवण्यासाठी सागरिका यांनी नॉर्वे सरकार विरोधात लढा सुरु केला. या संघर्षामध्ये भारत सरकारने त्यांचे सहकार्य केले. पण काही काळानंतर या प्रकरणामध्ये दखल देणे सरकारने थांबवले. पुढे नोव्हेंबर २०१३ मध्ये सागरिका भट्टाचार्य यांची सायकेट्रिक टेस्ट घेण्यात आली. या चाचणीमध्ये सागरिका त्यांच्या मुलांचे पालन करण्यासाठी सक्षम असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर २०१३ मध्ये दोन्ही मुलांना त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.