scorecardresearch

Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…”

पण एका मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलेल्या त्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना पाहायला मिळत आहे. दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. या चित्रपटात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. चिन्मयने साकारलेल्या या भूमिकेचे सर्वजण विशेष कौतुक करत आहे. पण एका मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलेल्या त्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

द कश्मीर फाइल्स या चित्रपटात बिट्टाची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर नुकतंच एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्या वाहिनीच्या मुलाखत घेणाऱ्या अँकरने चिन्मयबाबत परिचय देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या अँकरने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवाजी असा केला. यावर चिन्मयने त्याला थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा असे फार प्रेमळ शब्दात सांगितले.

त्यावेळी त्याचे महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. नुकतंच याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यानेही हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यासोबत त्याने चिन्मयचे विशेष कौतुकही केले आहे.

“निव्वळ अभिमान…निव्वळ अभिमान.. मित्रा चिन्मय, माझ्या माहितीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, माझा जवळचा मित्र, माझा भाऊ म्हणून तुझा अभिमान होताच.. परंतु, आजच्या या कृतीने यशाच्या वेगळ्या शिखरावर असताना सुद्धा तू आपल्या दैवताला विसरला नाहीयेस हे पाहून अभिमानाने ऊर भरून आला.”

“छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पदरात अशाच प्रकारच्या यशाच्या ओंजळीचा कृपाप्रसाद घालत राहोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना.. जय शिवराय. हर हर महादेव”, असे दिग्पाल लांजेकर यांनी म्हटले आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून ‘जग्गू’ आजोबांची एक्झिट, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

दिग्पाल लांजेकरांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या पोस्टला लाईक्स आणि कमेंट केले आहेत. तसेच त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांच्या कमेंटही पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडीओही आवडल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे. दरम्यान दिग्पाल लांजेकर यांच्या पावनखिंड या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digpal lanjekar comment and share recent interview video of chinmay mandlekar talk about chhatrapati shivaji maharaj nrp

ताज्या बातम्या