Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री वनिता खरात सुद्धा याच शोमुळे नावारुपाला आली. गेल्या काही वर्षांत वनिताने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.

वनिताने मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला खूप संघर्ष केला. एकपात्री नाटकापासून सुरु झालेला तिचा प्रवास आता मराठीसह बॉलीवूड चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. नुकतीच तिच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली आहे. याचा फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वर्तमानपत्रात येणारी शब्दकोडी सोडवायला प्रत्येकाला आवडतं, अनेकांना ही शब्दकोडी सोडवण्याचा छंद असतो. लोकसत्ता वृत्तपत्रात आलेल्या अशाच एका शब्दकोड्यात वनिता खरातबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. या शब्दकोड्याचा फोटो शेअर करत एका चाहत्याने या पोस्टमध्ये वनिताला टॅग केलं आहे.

अभिनेत्रीबद्दल शब्दकोड्यात “XXX खरात… महाराष्ट्राची हास्यजत्रामधील एक अभिनेत्री” असा प्रश्न विचारण्यात आला होता. अभिनेत्रीचा चाहता या शब्दकोड्याचा फोटो शेअर करत लिहितो, “१३ वा उभा शब्द… याचं उत्तर आहे वनिता खरात. लोकसत्ता वृत्तपत्रात हे कोडं आलं होतं, तेव्हा माझ्या आईने दाखवलं.”

वनिता हा फोटो पाहून एकदम खूश झाली होती. अभिनेत्रीने चाहत्याची ही स्टोरी रिशेअर करत, “हे किती गोड आहे” अशी प्रतिक्रिया यावर दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
vanita kharat
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात ( Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat )

दरम्यान, आजच्या घडीला अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- हास्य बुद्रुक’ सीझन जिंकल्यावर वनिताने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘कबीर सिंग’मध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांसाठी कायम लक्षवेधी ठरते. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीला बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती.