एखाद्या मालिकेचं कथानक, कलाकारांचा अभिनय आणि मांडणी यांची सांगड उत्तम असली तर ती मालिका हिट ठरते. मग त्या मालिकेसाठी वेळ म्हणजे प्राइम टाइम हे देखील महत्त्वाचं नसतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका. रात्री ११ वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेला प्रक्षेकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मालिकेने काल, १५ एप्रिलला ७०० भागांचा टप्पा पूर्ण केला.
कोठारे व्हिजन निर्मित ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका जानेवारी २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेत केंद्रबिंदू असणारी भूमिका ‘पिंकी’ ही पूर्वी अभिनेत्री शरयू सोनावणे साकारायची. पण तिची गेल्यावर्षी अचानक मालिकेतून एक्झिट झाली. पण याचा परिणाम मालिकेच्या प्रेक्षकांवर झाला नाही. कारण अभिनेत्री आरती मोरेने ‘पिंकी’ची भूमिका उत्कृष्टरित्या पेलली आहे. शिवाय मालिकेतील इतर कलाकार मंडळींनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने ७०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारेंसह कलाकारांनी सेलिब्रेशन केलं.
‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील कलाकारांनी आज आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला. यावेळी चाहत्यांच्या प्रत्येक प्रेक्षकांची उत्तर मालिकेतील कलाकारांनी दिली. तसेच महेश कोठारे देखील बोलले. त्यानंतर ७०० नंबरचा केक कापून सगळ्यांनी हा खास क्षण साजरा केला. याचा व्हिडीओ युवराज म्हणजे अभिनेता विजय आंदळकरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडीओत, महेश कोठारे म्हणाले की, “एकतर सगळ्यांचं अभिनंदन. संपूर्ण टीमचं अभिनंदन. विशेष म्हणजे कोठारे व्हिजनचं अभिनंदन. एक मालिका १००० टप्पा पार करते आणि दुसरी मालिका ७०० टप्पा पार करते, ही फार मोठी गोष्ट आहे. ‘पिंकीचा विजय असो’ हे मालिकेचं शीर्षक आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं. चॅनलच्या पाठिंब्यामुळे आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे त्यांचे आभार. अजूनही ७०० भाग पूर्ण करू, असं आम्ही गृहित धरतो. रात्री ११ वाजता मालिका असूनही एवढा टीआरपी मिळतो हा एक रेकॉर्ड आहे. मला नाही वाटतं, इतक्या लवकर हा रेकॉर्ड कोणी मोडू शकेल.”