मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे तेजश्री प्रधान. ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी तेजश्री आता आघाडीची अभिनेत्री झाली आहे. तिने आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिची कुठलीही मालिका असो प्रेक्षक वर्ग त्यावर भरभरून प्रेम करत असतात. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तेजश्रीने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली. या मालिकेतील तिच्या पात्रापासून ते तिने परिधान केलेले दागिने, साडी हे सगळं चर्चेत असायचं. त्यानंतर आलेली तिची ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका देखील सुपरहिट झाली.
तेजश्रीने मालिका व्यतिरिक्त चित्रपट, नाटकात देखील काम केलं आहे. एवढंच नव्हे तर तिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचा ठसा उमटवला आहे. सध्या तिची ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका जोरदार सुरू आहे. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी तेजश्रीबाबत एक दुःखद घटना घडली. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तिच्या आईचं निधन झालं. यासंदर्भात तिने कुठेही भाष्य केलं नाही. आईचं निधन होऊनही तेजश्रीने दुःख झेलत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम अविरत सुरू ठेवलं. तिच्या आईच्या निधनाला आज ६ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने तिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर आईविषयी भावुक पोस्ट केली आहे.
आईबरोबरचा फोटो शेअर करून तिने भावुक पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये तेजश्रीचा गौरव होताना दिसत असून तिच्या पाठिशी तिची आई खंबीरपणे उभी असलेली पाहायला मिळत आहे. हा सुंदर फोटो शेअर करत तेजश्रीने लिहिलं आहे, “आई…६ महिने झाले…पाठिशी आहेस ना अशीचं, राहा कायम…”
तेजश्रीची ही भावुक पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री साक्षी गांधी, अपूर्वा नेमळेकर, शिवानी बावकर, मानसी जोशी रॉय, किर्ती किल्लेदार अशा अनेक कलाकारांनी पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा – “पुस्तक वाचन अन्…”, शुभांगी गोखलेंनी सांगितलं सखी आणि मोहन गोखलेंमधील साम्य, म्हणाल्या…
दरम्यान, तेजश्रीच्या आईचं नाव सीमा प्रधान असं असून १६ नोव्हेंबरला त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. तेजश्रीचं आईबरोबरचं नातं खूप छान होतं. कोणत्याही कार्यक्रमात तेजश्रीची आई तिच्याबरोबर कायम असायची. त्यांनी अनेकदा तेजश्रीच्या कामाचं खूप कौतुक केलं आहे.