‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली. मुग्धाने आपल्या गोड आवाजाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गायिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील विविध अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मुग्धाने नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मुग्धाचे वडील गेल्या ३३ वर्षांपासून नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुग्धाचे वडील भगवान वैशंपायन सेवानिवृत्त झाले. या समारंभातील काही भावनिक क्षण एका व्हिडीओच्या माध्यमातून मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मुग्धाने या संपूर्ण व्हिडीओमध्ये वडिलांचं ऑफिस, आजूबाजूचा परिसर आणि त्यांच्या सत्कार समारंभातील भाषणाची झलक दाखवली आहे. या पोस्टमध्ये गायिका लिहिते, “३० नोव्हेंबर २०२३, बाबा गेली सुमारे ३३ वर्षे नागोठणे येथील IPCL / रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होतात. सलग ३३ वर्ष एकाच ठिकाणी, एकाच प्लांटमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचं आणि आमचं सुद्धा कंपनी बरोबर भावनिक नातं होतं, आजही आहे…३० नोव्हेंबरला बाबा रिटायर झाले…त्या दिवसाचे काही भावनिक क्षण”
दरम्यान, मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने या व्हिडीओवर, “मुग्धा, तुझ्या बाबांचे खूप कौतुक की, ज्यांनी तुझ्यासारख्या मुलीला घडवले.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, अन्य काही नेटकऱ्यांनी “तुझ्या बाबांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.