Zee Marathi New Serial Tejashree Pradhan & Subodh Bhave : ‘झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘देवमाणूस’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता या पाठोपाठ ३० जूनपासून ‘कमळी’ मालिका ऑन एअर होणार आहे. ‘कमळी’ या मालिकेची सर्वत्र चर्चा असतानाच आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी घोषणा ‘झी मराठी’ वाहिनीकडून करण्यात आली आहे. या नव्या मालिकेचं नाव, यातील कलाकार अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

‘झी मराठी’ वाहिनीने नुकतीच त्यांच्या नव्या मालिकेची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेचा नायक म्हणतो, “घरची जबाबदारी पेलताना हळुहळू वय निघून गेलं, लोकांचं माहिती नाही पण, माझ्यासाठी लग्न म्हणजे वचन आणि जबाबदारी निभावणं. एकमेकांचं होता-होता आपल्या कुटुंबाला सांभाळणं. माझा स्वीकार करणारी व्यक्ती… आता मिळणं थोडं अवघड वाटतंय…पण, कोणाला सांगू की कधी-कधी मलाही एकटेपणा सतावतोय.”

तर, यामध्ये नायिका म्हणते, “मला अनेकजण म्हणतात, अगं… वय झालं आतातरी लग्न उरकून घे. मलाही वाटतं की आपलं म्हणणारं हक्काचं माणूस आयुष्यात असावं. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा त्याने आमचं नातं जपावं. पण, अशी मुलं आहेत का या दुनियेत. तो वरचा माझी लग्नगाठ बांधायला विसरलाय बहुतेक…”

या दोघांचा चेहरा या प्रोमोमध्ये रिव्हिल करण्यात आलेला नाही. मात्र, बॅकग्राऊंडला या दोन्ही पात्रांचा आवाज ऐकताच क्षणी नेटकऱ्यांनी या दोन्ही कलाकारांना अचूक ओळखलं आहे.

‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची जोडी एकत्र झळकताना पाहायला मिळणार आहे. तेजश्री आणि सुबोधचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या दृष्टीकोनातून ब्लॉकबस्टर ठरेल असाही अंदाज नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केला आहे.

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नव्या मालिकेचा प्रोमो आज ( २४ जुलै ) रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फायनली तेजू दीदी परत आलीये… तो गोड आवाज”, “सुबोध आणि तेजश्री आवाजावरूनच ओळखू येतंय”, “फायनली प्रोमो येतोय…तेजश्री आणि सुबोधला एकत्र पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.