दोन विभागांच्या समन्वयातून संकुलात करोना चाचण्यांवर भर

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : ग्रँट रोड, नाना चौक परिसरात गेल्या काही दिवसांत सापडलेल्या करोनाबाधितांपैकी बहुतांश रुग्ण वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीत कामाला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बीकेसीमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले आहे का याचा शोध पालिकेने सुरू केला आहे. पालिकेच्या एच. पूर्व आणि डी. विभागाने मिळून आता बीकेसीमधील कार्यालयातही करोनाच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे.

टाळेबंदी शिथिल केल्यानंतर नाना चौक-ग्रँट रोड, मलबार हिल परिसराचा भाग असलेल्या डी. विभागात रुग्णसंख्या वाढू लागली होती. त्यामुळे विभाग स्तरावर चाचण्या, इमारती प्रतिबंधित करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या. परंतु इमारती मोकळ्या केल्या की पुन्हा रुग्ण वाढत आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांना संसर्ग होतो. मात्र त्यांचे घर इथे असल्यामुळे त्यांची नोंद इथे होत आहे. त्यामुळे प्रथमच अशा दोन विभागांच्या समन्वयाने अशा पद्धतीने चाचण्या के ल्या जात आहेत.

टाळेबंदी शिथिल केल्यानंतर लोक आपापल्या कामावर, व्यवसायाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना संसर्ग होतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबातील लोकांना बाधा

होत आहे. त्यामुळे आता कार्यालयांवरही लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

बाधित रुग्ण कुठे काम करतो, याची माहिती घेत आहोत. ही माहिती गोळा करीत असताना अनेक रुग्ण वांद्रे-कुर्ला संकुलात कामाला असल्याचे आढळून आले.

किमान ६० रुग्ण हे बीकेसीत काम करणारे आहेत. मग त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाला आणि तिथून पुढे असा हा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे एच. पूर्व विभागाशी समन्वय साधून आम्ही आता बीकेसीमधील त्या संबंधित कार्यालयांमध्येही चाचण्या सुरू केल्या आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

नवजीवन सोसायटीत पुन्हा रुग्णवाढ

ग्रँट रोड पूर्वेकडील नवजीवन सोसायटीतील रुग्णांची संख्याही पुन्हा वाढू लागली आहे. १८ इमारतींचा समावेश असलेल्या या संकुलात एकाच वेळी ३६ रुग्ण आढळल्यामुळे हे संपूर्ण संकुल प्रतिबंधित करण्यात आले होते. त्यानंतर येथील रुग्णवाढ आटोक्यात आली होती. मात्र संकुल मोकळे केल्यानंतर तसेच टाळेबंदी शिथिल केल्यानंतर गेल्या आठवडाभरात इथे पुन्हा रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यंत या संकुलातील एकूण बाधितांचा आकडा ८२ वर गेला आहे.