मुंबई : सुमारे १२ हजार ५८६ कोटी रुपये खर्चाच्या आणि ९४ किलोमीटर लांबीच्या भंडारा – गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी ९३१ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यता आली. या महामार्गामुळे भंडारा ते गडचिरोली प्रवासाचे अंतर २३ किलोमीटरने कमी होणार आहे.

विदर्भातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम करण्यासाठी भंडारा गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस डिसेंबर २३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. आता या महामार्गांतर्गत नागपूर – गोंदिया प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या सावरखंडा पासून राज्य महामार्ग ५३ वरील कोकणागडपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे.

तसेच बोरगाव ते राज्य महामार्ग ३५३ ड वरील रणमोचनपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. या महामार्गामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्हे थेट नागपूर आणि पुढे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबईला जोडले जाणार आहेत.