मुंबई : मुंब्रा येथे जून २०२५ मध्ये लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला. यावर उपाय म्हणून रेल्वे मंडळाने स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर, सुमारे ५० दिवसांत मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलसाठी स्वयंचलित दरवाजा असलेला नमुना डबा विकसित करण्यात आला आहे.

स्वयंचलित दरवाजा असलेला लोकलचा डबा तयार करण्यात आला आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष (सीआरबी) सतीश कुमार ४ ऑगस्ट रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांना हा डबा दाखविण्यात येण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्वयंचलित दरवाजा असलेला डबा तयार करण्यात आला आहे. सीआरबीकडून या डब्याची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र ही तपासणी नेमकी कधी करणार हे निश्चित नाही.

रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचा पुढाकार

मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरीतील (आयसीएफ) अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक घेतली. त्यानंतर, सामान्य लोकलच्या रचनेत बदल करून हवा खेळती राहील अशा पद्धतीची रचना करून डबा तयार केला जाईल, असे बैठकीत ठरविण्यात आले होते.

लोकलमध्ये डब्यात हवा खेळती राहण्यासाठी कोणते केले उपाय ?

सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बंद केल्यास वायुवीजन कमी होऊन प्रवासी गुदरमतील. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधण्यात आला. स्वयंचलित दरवाजांना लूव्हर्स (हवेशीर पट्ट्या) असतील. या लूव्हर्समधून हवा खेळती राहील. डब्यामध्ये ताजी हवा यावी यासाठी लोकलच्या छतावर वेंटिलेशन युनिट असतील.

लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाडीप्रमाणे लोकलचे डबे एकमेकांना जोडणार

सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बंद केल्यानंतर सामान्य लोकलचे डबे हे एकमेकांना जोडले जातील. लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाडीच्या पहिल्या डब्यामध्ये चढल्यास शेवटच्या डब्यापर्यंत जाता येईल. तसेच, लोकलच्या एका डब्यामध्ये चढल्यास, दुसऱ्या डब्यामध्ये जाणे शक्य होईल. यामुळे गर्दी विभाजित करणे शक्य होईल. सध्या वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडलेले आहेत.

जानेवारी २०२६ मध्ये प्रवाशांच्या सेवेत नवीन लोकल

नवीन रचनेची पहिली लोकल नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत तयार होईल. आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नवी लोकल जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

पश्चिम रेल्वेचे प्रयत्न अयशस्वी

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलप्रमाणे विनावातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रयत्न डिसेंबर २०१९ मध्ये करण्यात येत होता. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात प्रवाशांसाठी उपयोगात येईल, यात शंका होती. दरवाजा उघड्यासाठी आणि बंद होण्यासाठी लागणारा कालावधी, प्रवाशांमुळे दरवाजा बंद होण्यात येणाऱ्या अडचणींमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.