मुंबई : कोणीही एकत्र आले, तरी आमचा विजय थांबवू शकत नाही आणि आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाविजय संकल्प’ मेळाव्यात मंगळवारी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक ‘ब्रँड’ होता, पण नुसते नाव लावल्याने तुम्ही ‘ब्रँड’ बनत नाही, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती झाल्यावर वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष साटम, माजी अध्यक्ष आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, खासदार उज्ज्वल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर थोडक्यात हुकला, असे सांगून फडणवीस म्हणाले, भाजपचे दोनच नगरसेवक कमी निवडून आले, तरी आम्ही गणित जमविले होते व भाजपचा महापौर निवडून आणणे शक्य होते. पण शिवसेनेचा महापौर हवा, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा असून ते निराश व नाराज असल्याचे एकनाथ शिंदे व मिलींद नार्वेकर यांनी मला दूरध्वनी करुन सांगितले होते. त्यामुळे आम्ही मन मोठे करुन त्यांच्या शिवसेनेला महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद दिले. पण ठाकरे यांनी २०१९ मध्ये सत्ता ओरबाडून घेतल्याने आम्ही २०२२ मध्ये गनिमी कावा केला आणि २०२४ मध्ये बहुमताने महायुतीचे सरकार राज्यात निवडून आणले.

बेस्टची पतपेढीची साधी निवडणूक असल्याने ती कशाला पक्षाच्या नावावर लढवायची. पण आमच्या नेत्यांनी ठाकरेंच्या ब्रँडचा बँडबाजा वाजविला, अशी उपरोधिक टीका फडणवीस यांनी केली. बाळासाहेब ठाकरे हा एक ब्रँड होता, तुम्ही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ही मुंबई कोणाची आहे, हे मुंबईकरांनी २०१४,१९ व २४ च्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले.

महाविकास आघाडीने मराठी माणसाला मुंबईबाहेर घालविले. पण आमच्या सरकारने वरळीतील बीडीडी चाळीतील मराठी माणसाला ५४० चौ. फुटांची घरे देण्याचा निर्णय घेतला, धारावीत केवळ पात्रच नाही, तर अपात्र रहिवाशांनाही घरे देण्यात येणार आहेत. स्वयंविकासाचे १६०० प्रकल्प उभारले जात आहेत, ३५४ किमीचे मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. पण विरोधकांचे सरकार मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू, किनारपट्टी रस्ता आदी कोणतेही प्रकल्प पूर्ण करु शकले नाहीत.

महायुतीच्या कार्यकाळात मुंबईचा विकास वेगाने होत असून आम्ही ‘कल्पनेतील मुंबई ’ (रीइमॅजिन) साकारत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई व महाराष्ट्रावर हिरवे वादळ घोंघावत आहे

मुंबईचा रंग बदलण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. मुंबई व महाराष्ट्रावर हिरवे वादळ घोंघावत असून त्याला रोखण्याची क्षमता केवळ भाजपमध्ये आहे, असे प्रतिपादन करीत भाजपचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महाविकास आघाडीच्या हाती महापालिकेची सत्ता गेली, तर कोणीतरी ‘ खान ’ मुंबईचा महापौर होईल, प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल आणि दारात बांगलादेशी उभा राहील, अशी भीती साटम यांनी व्यक्त केली. त्यामुळे ही लढाई मुंबईच्या विकासाची आहेच, पण ती सुरक्षिततेचीही आहे, असे साटम यांनी सांगितले.

देशातील सर्वात मोठा तीन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला आहे. स्थायी समितीच्या टक्केवारीवर जगतात आणि मराठीच्या नावाने राजकारण करीत असल्याची टीका साटम यांनी केली.