मुंबई : कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महापालिकेने नियंत्रित पद्धतीने खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे सरकारने जैन समाजाच्या दबावापुढे नमते घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. भाजप राजकीय फायद्यासाठीच जैन समाजाला खूश करीत असल्याची टीका शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कबुतरखान्यांच्या प्रश्नासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने सूचना केल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली. मात्र जैन समाजाने याला विरोध केला.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही कबुतरखाने बंद करण्यास विरोध दर्शविला. जैन समाजातील काही जणांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाची मागणी मान्य करीत सपशेल माघार घेतल्याची टीका शिवसेना (ठाकरे) व मनसेने केली आहे. कबुतरखान्यांबाबत जैन धर्मीयांच्या मताचाही आदर आहे. मात्र कबुतरांमुळे क्षयरोगासारखा आजार पसरत असेल तर कबुतरखान्यांच्या परिसरात अशा प्रकारचे किती रुग्ण आढळले याचेही सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी म्हटले आहे.

कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा करावा, याबाबत नियमावली तयार करण्यात यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात; परंतु याबाबत कबुतरखान्यांच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून त्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही फडणवीस म्हणाले.

नियंत्रित खाद्य पुरवायला कबुतरे म्हणजे शिंदेंचे आमदार नाहीत… लोढा मुंबईचे पालकमंत्री असूनही कबुतरखान्यांबाबत महापालिकेला पत्र लिहितात हे धक्कादायक आहे. आम्ही स्थानिकांच्या मताशी सहमत आहोत. लोढा हे वरळी समुद्रकिनारी बंगला बांधत आहेत. तिथे कबुतरांची चांगली व्यवस्था होईल. आदित्य ठाकरे, आमदार (शिवसेना).

पुरोगामी महाराष्ट्रात धर्माचे स्तोम कशाला? हिंदू धर्मातही पूर्वी सापाला दूध पाजण्याची प्रथा होती. मात्र शास्त्रीयदृष्ट्या सापाला दूध पाजणे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती बंद केली. कबुतरांच्या बाबतीतही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन सरकारने भूमिका घेणे योग्य नाही. – संदीप देशपांडे, मुंबई अध्यक्ष, मनसे.