मुंबई – एका महिलेला अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावून दिड लाखांची खंडणी उकळण्यात आली आहे. अश्लील चित्रफित सर्वदूर प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. अखेर महिलेने तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार महिला विवाहित असून मालाडच्या पठाणवाडी परिसरात राहते. ती २०२२ मध्ये एकदा अंघोळ करत असताना आरोपी अकबर गांची (३७) याने छुप्या कॅमेऱ्याने नकळत तिचे चित्रिकरण करून एक चित्रफित तयार केली होती. या चित्रफितीच्या आधारे अकबर या महिलेला ब्लॅकमेल करून लागला. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेला शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या शारिरिक संबंधाची चित्रफितही त्याने तयार करून ठेवली होती. पुन्हा ही चित्रफित पतीला दाखविण्याची धमकी देऊन तो पैसे आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करू लागला. त्यानुसार महिलने त्याला ८ तोळे सोने आणि दिड लाख रुपये रोख दिले होते. २०२२ ते जून २०२५ या काळात आरोपी अकबर वारंवार या महिलेला अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावून शारिरिक संबंध प्रस्थापित करत होता.
अखेर हा प्रकार पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितला आणि त्यानी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी आरोपी अकबर गांची याच्याविरोधात धमकावून बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ६४ (२), खासगी कृती करताना महिलेला पाहणे आणि त्याचे चित्रिकरण केल्याप्रकरणी कलम ७७, खंडणी मागितल्याप्रकरणी कलम ३०८ तसेच अश्लील चित्रफित तयार केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.