मुंबई : दक्षिण मुंबईतील लायन गेटसमोरील पदपथावर मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार असून या शौचालयाला भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी विरोध केला आहे. पदपथावर शौचालय बांधल्यास ते पालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ धोरणाचे उल्लंघन होईल असे मत त्यांनी व्यक्त केली आहे. हे कामे ताबडतोब थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
लायन गेट, विधान भवन परिसर, फॅशन स्ट्रीट, बाणगंगा, गिरगाव दर्शक गॅलरी अशा पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने १४ वातानुकूलित प्रसाधनगृहे बांधण्याचे ठरवले आहे. मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. मात्र या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शौचालयांची सुविधा नसल्याने पर्यटकांची विशेषतः महिलांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यामुळे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनस्थळी शौचालये बांधण्याची सूचना दिली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने पर्यटनस्थळी सोयीसुविधांनी युक्त अशी वातानुकूलित प्रसाधनगृहे तयार करण्याचे ठरवले होते. मुंबईत १४ ठिकाणी अशी प्रसाधनगृहे सुरू केली जाणार असून त्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी लायन गेट येथील शौचालयाला नार्वेकर यांनी विरोध केला आहे.
या प्रकरणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून पदपथावर शौचालय बांधणे हे पालिकेच्या ”पादचारी प्रथम” धोरणाचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे. तसेच हे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. पदपथावर शौचालय बांधल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय होईल. चालायला जागाही उरणार नाही असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी नार्वेकर यांनी हेरिटेज कमिटीलाही पत्र लिहिले असून काळा घोडा परिसर हा ग्रेड १ हेरिटेज परिसर असून त्याचे सौंदर्य नष्ट होईल असेही नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या कामाचे कार्यादेश तत्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नौदलाची पुरातन वास्तू असलेल्या लायन गेटसमोरील ग्रेड ए हेरिटेज परिसरात सार्वजनिक शौचालय बांधणे ही आश्चर्यकारक बाब असल्याचे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.