मुंबई : महाराष्ट्र – गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग) प्रकल्पाला गती देण्यासाठी २०,७८७ कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कोल्हापूरमधील मंत्र्यांनी विरोध दर्शविल्याने कोल्हापूरमध्ये या महामार्गाला वळसा घालण्याचा विचार सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता स्थानिकांची तूर्त नाराजी दूर करण्याकरिता कोल्हापूरकरांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर – रत्नागिरी महामार्गाचे रुंदीकरण करून शक्तीपीठ महामार्ग या रस्त्याला जोडण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्याचे कळते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी आहे. सुपीक आणि बारमाही ओलिताखाली असलेली जमीन देण्यास शेतकरी तयार नाहीत. कोल्हापुरातून नागपूर – रत्नागिरी महामार्ग गेला आहे, तो प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला समांतर आहे. त्यामुळे पुन्हा शक्तिपीठ महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा विरोध दिवसोंदिवस वाढत असल्यामुळे सद्यस्थितीत कोल्हापुरात भूसंपादन करू नये. नागपूर – रत्नागिरी महामार्गाचे रुंदीकरण करून शक्तीपीठ महामार्ग या महामार्गाला जोडावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमिनीही जाणार नाहीत आणि वाहतुकीला अडथळाही निर्माण होणार नाही, अशी भूमिका आबिटकर आणि मुश्रीफ यांनी मांडल्याचे कळते. उभय मंत्र्याच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूर – रत्नागिरी महामार्गाचे रुंदीकरण करून शक्तीपीठ महामार्ग या महामार्गाला जोडण्याचा पर्याय खुला ठेवला असून, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आबिटकर आणि मुश्रीफ यांच्या संयुक्त बैठकीत या बाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे कळते.

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी २०,७८७ कोटी रुपयांची तरतूद केली. प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता हुडकोकडून १२ हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून सुमारे ७,५०० हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांचा सावध पवित्रा

कोल्हापूरमध्ये भूसंपादनाला होणारा विरोध लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेतला. कोल्हापूरमध्ये भूसंपादनासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. सर्वांशी चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे शिंदे यांनी नंतर सांगितले. कोल्हापूरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी शिंदे यांनी भर दिला असताना शक्तिपीठवरून लोकांमध्ये निर्माण होणारा रोष लक्षात घेता शिंदे यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली.

सतेज पाटील, शेट्टींचा विरोध कायम

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील लढा यापुढेही चालूच राहिल, असे काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केले. आगामी निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ भूसंपादनाचा मुद्दा महाविकास आघाडीकडून तापविला जाण्याची चिन्हे आहेत.

नशीब बलवत्तर म्हणून निवडून आलो

शक्तिपीठ महामार्गाचा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही निवडून आलो आहे. शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करू नका, अशी आग्रही भूमिका कोल्हापुरातील उभय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचे कळते.

लोकांची भावना तीव्र

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमाल जमीन धारणा कमी आहे. नागपूर – रत्नागिरी, हा पर्यायी महामार्ग अस्तित्वात असल्यामुळे शेतकरी जमीन सुपीक देण्यास तयार नाहीत. त्यामुळे नवा शक्तीपीठ महामार्ग नको, अशी लोकांची तीव्र भावना आहे. लोकभावना आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. या बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कसा आहे हा महामार्ग ?

विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाला बाधित शेतकरी, पर्यावरण प्रेमी आणि शेतकरी संघटनांसह विरोध पक्षांकडून कडाकडून विरोध होत आहे. तरीही मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती देण्याचा निर्णय घेऊन, २०,७८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटर लांबीचा हा द्रूतगती मार्ग पवनार (जि.वर्धा) येथून सुरू होऊन यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरमार्गे पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) येथे महाराष्ट्र – गोवा सीमेपर्यंत जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिथून पुढे हा महामार्ग कोकण द्रूतगती महामार्गास गोवा -महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाई स्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच १२ ज्योर्तिलिंगापैकी दोन औंढा नागनाथ व परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह कारंजा – लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळेही जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांच्या प्रवासाचे अंतर आठ तासांवर येणार आहे.