मुंबई : राज्यभरात मोसमी पाऊस सक्रीय झाला असला तरीही पावसाच्या वितरणात असमानता आहे. कुठे अति पावसामुळे शेतशिवारात चिखल आहे, तर कुठे अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. प्रामुख्याने विदर्भात पुरेसा पाऊस नसल्यामुळे आणि उर्वरीत महाराष्ट्रात अति पावसामुळे खरीप पेरण्या रखडल्या आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, २५ जूनअखेर सरासरीच्या ३९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर विभागात लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोलीत ५८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापुरात ५१ टक्के आणि अमरावती विभागातील पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळमध्ये ४२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर विभागात ३७ टक्के, नाशिक विभागात ३९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
मुसळधार पावसानंतर पेरणी योग्य वाफसा नसल्यामुळे आणि शेत शिवारात अद्यापही चिखल असल्यामुळे कोल्हापूर विभागात फक्त २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अद्यापही चिखल असल्यामुळे पेरण्यांना गती मिळाली नाही. कोकण विभागात फक्त पाच टक्के पेरणी झाली आहे. भात रोपे आल्यानंतर पेरण्यांना गती येईल.
पूर्व विदर्भात म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत फक्त १५ टक्के पेरणी झाली आहे. त्यापैकी वर्ध्यात ३१ आणि चंद्रपुरात २९ टक्के पेरणी झाली आहे. नागपूरमध्ये फक्त दोन आणि भंडारा, गोंदियात प्रत्येकी एक आणि गडचिरोलीत सहा टक्के पेरणी झाली आहे.
मक्याचा पेरा सर्वाधिक
सोयाबीन आणि कापसाच्या दरात मोठी पडझड झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मका पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. अन्य पिकांचा पेरा कमी असताना मका पिकांने पेरणीत आघाडी घेतली आहे. सरासरीच्या ६३ टक्क्यांवर पेरणी गेली आहे. अद्याप पेरण्यांना महिनाभर बाकी असतानाच गत वर्षाचा ५ लाख हेक्टरचा टप्पा ओलांडून सहा लाख हेक्टरवर पेरणी गेली आहे.
राज्यात मक्याचे सरासरी क्षेत्र ९ लाख ३३ हजार ८१९ हेक्टर आहे. गतवर्षी पाच लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा ५ लाख ९२ हजार ७१९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हंगामाच्या अखेरीस दहा लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावर मका लागवड होण्याचा अंदाज आहे.