मुंबई : मुंबईतील ११ हजार ५९९ घरांची जूनमध्ये विक्री झाली असून या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्क वसुलीच्या माध्यमातून राज्य सरकारला १०३५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मुंबईतील ११ हजार ५६५ घरांची मेमध्येही विक्री झाली होती, यातून राज्य सरकारला १०६५ कोटी रुपये महसूल मिळाला होता.
एका खासगी कंपनीच्या अहवालानुसार, देशातील सात महानगरांमधील घरांच्या विक्रीत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतील घरांच्या विक्रीत तिमाहीत २५ टक्क्यांची घट झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. घरांच्या वाढत्या किंमती, ऑपरेशन सिंदूर आणि इराण-इस्त्राईल युद्धामुळे तयार झालेला तणाव अशी या मागे कारणे असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात घरविक्रीच्या अधिकृत संख्येनुसार मुंबईतील घरविक्री स्थिर दिसत आहे.
एप्रिलमध्ये मुंबईतील १२ हजार घरांची विक्री झाली होती, राज्य सरकारला या घरविक्रीतून ९८६ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मेमध्ये मात्र घरविक्री किंचितशी घट झाली. मेमध्ये ११ हजार ५६५ घरांची विक्री झाली आणि यातून १०६५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसूल झाला होता. जूनमध्ये घरविक्रीने साडेअकरा हजाराचा पल्ला पार केला. जूनमध्ये मुंबईतील ११ हजार ५९९ घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीतून १०३५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी, जून २०२५ मध्ये ११ हजार ५६९ घरांची विक्री झाली होती. तर यातून राज्य सरकारला १००१ कोटी रुपये महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमधील घरविक्री स्थिर राहिली आहे. मार्चमध्ये सर्वाधिक १५ हजार ५०१ घरांची विक्री झाली होती आणि यातून १५०३ कोटी रुपये महसूल मिळाला होता. १ एप्रिलला रेडीरेकनरचे नवीन दर लागू होत असल्याने दरवर्षी मार्चमध्ये घरविक्रीत मोठी वाढ होते.
त्यानुसार यंदाही मार्चमध्ये १५ हजार घरे विकली गेली असून सहा महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. जानेवारीत १२ हजार २४९ घरे, तर फेब्रुवारीत १२ हजार ०६६ घरांची विक्री झाली होती. एप्रिलमध्येही १२ हजार घरे विकली गेली होती. मे आणि जूनमध्ये घरविक्री साडेअकरा हजारापर्यंत पोहचू शकली आहे. मागील तीन महिन्यांतील घरविक्री समाधानकारक मानली जात आहे. तर सहा महिन्यांचा विचार करता ७५ हजारांहून अधिक घरांची विक्री सहा महिन्यात झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांतील घरविक्रीत ५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०२४ मधील पहिल्या सहा महिन्यांत ७२ हजार ४९२ घरांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये घरविक्रीत ५ टक्क्यांची वाढ झाली असून महसुलातही १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी, २०२४ मधील पहिल्या सहामाहीत ५८७४ कोटी रुपये महसूल मिळाला होता. तर २०२५ मधील पहिल्या सहामाहीत ६ हजार ७२७ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. त्यामुळे मुंबईतील घरविक्री आणि मुद्रांक शुल्क वसूली समाधानकारक मानली जात आहे.