मुंबई : भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी २०२१ मध्ये केलेली तक्रार मागे घेतल्याने अतिरिक्त महानगरदडाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांच्याविरुद्धचा मानहानीचा फौजदारी खटला बंद केला.

तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने मलिक यांची मानहानीच्या फौजदारी खटल्यातून निर्दोष सुटका झाली आहे. त्यामुळे, त्यांच्याविरुद्धचा हा खटला बंद करण्यात येत आहे, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. कंबोज यांनी मलिक यांच्याविरूद्धचा खटला मागे घेण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २५७ अंतर्गत अर्ज दाखल केला होता.

या कलमानुसार, अंतिम आदेश देण्यापूर्वी तक्रारदाराला कधीही त्याची तक्रार मागे घेण्याची परवानगी आहे, तसेच, दंडाधिकारी तक्रार मागे घेण्याच्या कारणांबाबत समाधानी असतील तर ते आरोपीची निर्दोष सुटका करू शकतात.

हे न्यायालय दैनंदिन आधारावर हा खटला चालवणार आहे. तथापि, आपण खटल्याच्या दररोज होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे, आपण मलिक यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेऊ इच्छितो, असे कंबोज यांनी उपरोक्त अर्जात म्हटले होते. आपण ही तक्रार स्वेच्छेने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संदर्भात आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही किंवा जबरदस्ती करण्यात आलेली नाही, असेही कंबोज यांनी अर्जात म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंबोज यांनी २०२१ मध्ये मलिक यांच्याविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यात, त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) कॉर्डिलिया या क्रूझवर छापा टाकला होता. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह अनेकांना एनसीबीने अटक केल्यानंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कंबोज आणि त्यांचा मेहुणा ऋषभ सचदेव यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर, मलिक यांनी आपली आणि आपल्या मेहुण्याची हेतुपूरस्सर बदनामी केल्याचा दावा करून कंबोज यांनी मलिक यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तसेच, मानहानीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.