एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. प्रभाकर साईन यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. विविध राजकीय नेत्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

व्हिजिलन्स विभागाकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. याचा तपास संबधित विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. समीर वानखेडे करत असलेल्या तपासाबाबतही पुढे निर्णय होणार आहे. या चौकशीसाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलवले जाणार आहे. तसेच पंच प्रभाकर साईल यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या संपूर्ण चौकशीनंतर याचा अहवाल व्हिजिलन्स विभागाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर समीर वानखेडेंच्या तपासाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे.

त्यानंतर क्रूझ पार्टीप्रकरणी गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. आपल्या जीवाला धोका असल्यानं संरक्षण मागण्यासाठी पोलिसांकडे आल्याचं साईल यांनी म्हटले. दरम्यान, साईल यांच्या मागणीनंतर मुंबई पोलीस त्यांना संरक्षण देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणात तपासात अडथळे निर्माण करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी संचालक समीर वानखेडेंनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. “माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही, असं समीर वानखेडे यांनी कोर्टात म्हटलंय. तसेच माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहे,” असं त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे स्वत: कोर्टाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहीले होते. यावेळी “मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जातंय. माझ्यावर, माझ्या कुटुंबीयांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खासगी फोटो लिक करण्यात आलेत,” असं वानखेडे यांनी कोर्टात सांगितले.