प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य उपनगरीय रेल्वे मार्गावर लवकरच वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सोमवारी केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सीएसएमटी येथील मध्य रेल्वे मुख्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली.

ठाणे – सीएसएमटी – ठाणे अप आणि डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या होतील. यातील बहुतांश फेऱ्या सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी होतील. आठ जलद लोकल बदलापूरपर्यंत आणि दोन धीम्या लोकल ठाणे, तसेच कल्याणसाठी सोडण्याचे नियोजन आहे. सध्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळादरम्यान वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत आहेत. या लोकलच्या दररोज ५६ फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे ५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात कपात करण्यात आली. त्यानंतर वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे आणखी दहा फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे एकूण वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ६६ वर पोहोचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिकीट दरातील कपातीनंतरही हार्बरवरील सीएसएमटी – पनवेल आणि गोरेगावपर्यंत धावणाऱ्या लोकलला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील १६ फेऱ्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. या मार्गावरील १६ ऐवजी १२ फेऱ्या १४ मेपासून मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा मार्गावर चालवण्यात आल्या होत्या.पश्चिम उपनगरीय रेल्वेवर ८ ऑगस्टपासून ८ लोकल फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ४८ झाली आहे.