मुंबई : मुंबईतून चोरलेल्या ट्रकची गुजरातमध्ये विक्री करणाऱ्या एका टोळीतील दोघांना वनराई पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून ६ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. या टोळीचा म्होरक्या सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत १० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

गोरेगावमधून ८ जून रोजी एक ट्रक चोरीला गेला होता. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असता या चोरीचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले. सुरत पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी नरसिंह रुपस्वरूप सिंग (४४) याला अटक केला. तो मूळचा इंदोर येथील रहिवासी आहे. त्याने चोरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला. ट्रक चोरीप्रकरणी एक टोळी कार्यरत असल्याचे सिंगच्या चौकशीतून उघडकीस आले. जावेद अब्दुला शेख (५४) या टोळीचा म्होरक्या असून त्याच्याविरोधात पुणे, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नाशिक आदी राज्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येतात. ही वाहने गोदामात उभी असतात. जावेद शेख ही वाहने चोरून गुजरातमध्ये विकायचा. गुजरातमध्ये नेण्यात आलेल्या ट्रकचा इंजिन आणि चेसीस क्रमांक तेथील गॅरेजमध्ये बदलण्यात येत होता. गुजरातमधील प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या वाहनांची नोंदणी करण्यात येत होती. हे ट्रक गुजरातमध्ये कमी किंमतीत विकण्यात येत होते. आरटीओची मान्यता असल्याने यासंदर्भात कुणालाही संशय येत नव्हता. विशेष म्हणजे ही टोळी बॅंकेतून कर्ज देखील मिळवून देत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टोळीने चोरलेले सहा ट्रक जप्त करण्यात आले आहेत. मात्र या टोळीने अनेक ट्रकची चोरी केली असून त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दिली.