नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य अजय संचेती यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आज महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात संचेती यांच्या नावाचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न संचेती यांना महागात पडला आहे.

गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर संचेती यांचे पक्षात महत्त्व वाढले होते. गडकरी यांच्या प्रयत्नामुळेच संचेती यांना २०१२ मध्ये राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती. राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर संचेती यांचा कल फडणवीस यांच्याकडे दिसून आला. ते फडणवीस यांच्या प्रत्येक कार्यक्रमांत दिसू लागले होते. त्यामुळे गडकरी गटात नाराजी होती. त्याचा फटका संचेती यांना बसला आणि त्यांचे दुसऱ्यांदा राज्यभेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. महाराष्ट्रातून भाजपने चक्क केरळचे व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळ आपटे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अजय संचेती यांना २०१२ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातून भाजनपे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यभेची उमेदवारी दिली आहे.