नागपूर : न्या.भूषण गवई यांनी १४ मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. मूळत: विदर्भातील रहिवासी असलेले न्या.गवई सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले होते. मागील आठवड्यात सरन्यायाधीशांनी नागपूरमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. यापैकी दोन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सरन्यायाधीशांसोबत मंचावर उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई यांचा हायकोर्ट बार असोसिएशन तसेच नागपूर जिल्हा वकील संघटनेच्यवतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, सरन्यायाधीशांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विधी महाविद्यालयातील संविधान प्रास्ताविका पार्कचे उद्घाटन झाले तसेच वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही सरन्यायाधीशांच्या हस्ते पार पडले.
नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मंचावर सरन्यायाधीश भूषण गवई आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकत्रित होते. नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी सरन्यायाधीशांना आदेश दिला. याबाबत सरन्यायाधीशांनी स्वत: त्यांच्या भाषणातून माहिती दिली.
गडकरींनी काय आदेश दिला?
नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीश तसेच गडकरी यांच्यासह मोठ्या संख्येत मान्यवर उपस्थित होते. यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता. याशिवाय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्या.नितीन सांबरे, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, संविधान प्रास्ताविका पार्क निर्माण समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी, कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, माजी कुलगुरू डॉ. सिद्धिविनायक काणे, समितीतील सदस्य सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार मोहन मते यांच्यासह मोठ्या संख्येत मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरू झाला. यातही अनेक मान्यवरांनी लांबलचक भाषण केले. सरन्यायाधीश यांचे भाषण सर्वात शेवटी ठेवण्यात आले होते. सरन्यायाधीश यांनी भाषणादरम्यान सांगितले की त्यांनी वर्तमानपत्रात वाचले आहे की नितीन गडकरी यांचा १२ वाजता तर देवेंद्र फडणवीस यांचा १२.१५ वाजता एक दुसरा कार्यक्रम आहे.
कार्यक्रम उगाच लांबत असल्यामुळे गडकरी यांनी मंचावर उपस्थित केवळ तीन लोकांचे नाव घेण्याचे ‘आदेश ‘ दिले आहेत. सरन्यायाधीश यांनीही वेळेची मर्यादा बघता भाषणाची सुरूवात करताना केवळ तीन मान्यवरांचे नाव घेतले आणि उपस्थितांना संबोधित केले. सरन्यायाधीश यांनी गडकरींचा ‘आदेश ‘आहे, असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला तसेच गडकरी, फडणवीस यांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य बघायला मिळाले.