महेश बोकडे

नागपूर : कोळसा तुटवडय़ामुळे गेल्यावर्षी देशभरातील वीजनिर्मिती कंपन्यांची चांगलीच दमछाक झाली होती. यंदा वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)ने कोळशाचे उत्पादन वाढवल्याने राज्यातील महानिर्मितीच्या कोळसा साठय़ाची स्थिती सुधारली आहे. सध्या दहा दिवस पुरेल इतका साठा कंपनीकडे आहे. गेल्यावर्षी २०२२ मध्ये हा साठा केवळ साडेचार दिवसांचा होता.

Infrastructure boosts real estate sector
पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना
Financial crisis on sugar industry due to increase in FRP
‘एफआरपी’ वाढीमुळे साखर उद्योगावर आर्थिक संकट!
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Big increase in basmati exports 15 percent increase in exports is possible by the end of financial year
बासमतीच्या निर्यातीत मोठी वाढ; आर्थिक वर्षाअखेरीस निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ शक्य

वेकोलिकडे सध्या महाराष्ट्रातील उमरेड, सावनेर, मकरधोकडा चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, माजरी या आणि मध्य प्रदेशातील पाथाखेडा, पेंच, कन्हान या कोळसा खाणी आहेत. येथून निघणारा ९५ टक्के कोळसा महानिर्मितीसह इतर वीजनिर्मिती कंपन्यांना दिला जातो. तर ५ टक्के कोळसा सिमेंट व इतर उद्योगांना दिला जातो. गेल्यावर्षी १ एप्रिल २०२२ रोजी महानिर्मितीकडे केवळ साडेचार दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक होता.
उन्हाळय़ात एकीकडे महाराष्ट्रासह देशभरात विजेची मागणी वाढली असतानाच दुसरीकडे कोळसा तुटवडा निर्माण झाल्याने वीजनिर्मितीवरही परिणाम झाला होता. परिणामी, महानिर्मितीसह इतर खासगी कंपन्यांची वीजनिर्मिती कमी झाली होती. त्यामुळे महावितरणला मागणीच्या तुलनेत कमी वीज मिळाल्याने राज्यातील जास्त वीजहानी असलेल्या फिडरवर काही प्रमाणात भारनियमन करावे लागले.

वेकोलिने १ एप्रिल २०२३ ते १ जून २०२३ दरम्यानच्या काळात ११.१३० दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले. ते गेल्यावर्षी २०२२ मध्ये याच कालावधीदरम्यान ९.९८ दशलक्ष टन होते. एकूण कोळशाच्या उत्पादनापैकी महानिर्मितीसह केपीसीएल, जीएसईसी, एमपीजीसीएल, एनटीपीसी या वीज निर्मिती कंपन्यांना सुमारे ९६ टक्के कोळशाचा पुरवठा झाला. यातील ९० टक्के वाटा हा एकटय़ा महानिर्मिती या कंपनीला दिला गेला.

महानिर्मितीची प्रकल्पनिहाय कोळशाची स्थिती

महानिर्मितीच्या वेगवेगळय़ा प्रकल्पांमध्ये १ जून २०२३ रोजी एकूण १५ लाख मेट्रिक टन कोळशाचा साठा होता. दिवसनिहाय बघितले तर चंद्रपूरला ७ दिवस, कोराडी ७ दिवस, खापरखेडा २३ दिवस, पारस १० दिवस, भुसावळ १० दिवस, नाशिक १२ दिवस, परळी ६ दिवस पुरेल एवढा कोळसा साठा सध्या महानिर्मितीकडे आहे.

वेकोलिकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ६२.१५ दशलक्ष टन कोळशाचा विविध कंपन्यांना पुरवठा झाला. सर्वाधिक ५६.१ दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा वीजनिर्मिती कंपन्यांना झाला. सामूहिक प्रयत्नानेच हे शक्य झाले.- मिलिंद चहांदे, व्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, वेकोलि, नागपूर.