नागपूर : येथील शासकीय दंत महाविद्यालयातील बालदंतरोगशास्त्र विभागाकडून तयार ‘क्रीडा दंतचिकित्सा’च्या नवीन ‘फेलोशिप’ अभ्यासक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिली आहे. ही फेलोशिप लवकरच सुरू होणार असून देशात या पद्धतीचा हा पहिला अभ्यासक्रम ठरणार आहे.

भारत हा उदयोन्मुख क्रीडा केंद्र म्हणून विकसित होत आहे. एका अहवालानुसार जगभरात वर्षाला ५० लाख रुग्णांच्या दातांना इजा होते. त्यापैकी ३२ टक्के जखमी खेळाशी संबंधित असतात. जखमी खेळाडूंमध्ये सर्वाधिक दात, तोंड, जबड्याशी संबंधित इजा बघायला मिळतात. त्यासाठी दंतचिकित्सामध्ये तज्ज्ञ वाढायला हवेत, असे जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा – ‘एम.ए.’च्या अभ्यासक्रमात भाजप, रामजन्मभूमी आंदोलन; नागपूर विद्यापीठामध्ये काँग्रेस, कम्युनिस्टांच्या इतिहासाला कात्री

नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयातील बालदंतरोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रितेश कळसकर आणि चमूने पाच वर्षांपासून क्रीडा दंतचिकित्सावर काम केले. त्याअंतर्गत नागपुरातील दंत रुग्णालयात उपचाराला आलेल्या ७२१ क्रीडा प्रकारातील रुग्णांवर अभ्यास केला गेला. या विषयाचे महत्त्व बघत क्रीडा दंतचिकित्सावर फेलोशिपचा नवीन अभ्यासक्रम करून हा प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर झाला. त्याला आरोग्य विद्यापीठाची मान्यता मिळाली असून दंतचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या प्रयत्नाने हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार आहे. हा देशातील या प्रकारातील नोंदणीकृत पहिला अभ्यासक्रम असेल असे डॉ. कळसकर म्हणाले. दंतच्या अभ्यासात बाॅक्सिंग, सायकलिंग, धावणे, बॅडमिंटन, स्केटिंग, व्हाॅलीबाॅल, बास्केट बाॅल या खेळात सर्वाधिक खेळाडू जखमी झाल्याचे पुढे आले आहे.

खेळाडूचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी शारीरिक, मानसिक आरोग्यासह मौखिक आरोग्यही महत्त्वाची भूमिका बजावते. क्रीडा दंतचिकित्सामुळे खेळाडूच्या दात वा तोंडाला जखम झाल्यास झटपट अचूक उपचार होऊन तो लवकर बरा होऊ शकतो. दंत महाविद्यालयात या खेळाडूसाठी लवकरच स्वतंत्र क्लिनिक सुरू केले जाईल. – डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर.

हेही वाचा – पदभरतीसाठी लूट सुरूच; सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्याची घोषणा हवेतच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांमध्ये माहितीचा अभाव असल्याने अनेकदा दात वा तोंडाला इजा झाल्यावर मुलांना प्राथमिक उपचारासाठी दंतचिकित्सकाकडे नेले जात नाही. त्यामुळे विलंबामुळे काहींना कायमची दंत समस्या उद्भवते. नवीन क्रीडा दंतचिकित्सेमुळे खेळाडूला कमीत-कमी इजा व्हावी म्हणून आवश्यक समुपदेशन व जखमी झाल्यावर अचूक उपचार शक्य होईल. – डॉ. रितेश कळसकर, विभाग प्रमुख, बालदंतशास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर.