परिवहन विभागाच्या नोंदणीकडे डॉक्टरांची पाठ ; शंभरही डॉक्टरांची नोंदणी नाही

या नोंदणीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवल्याने हे प्रमाणपत्र ऑनलाइन होणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : आरटीओ कार्यालयांत व्यावसायिक वाहन चालवण्याचा परवाना घेणाऱ्यांसह चाळीसहून अधिक वयाच्या व्यक्तीला वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. परिवहन खात्याने हे प्रमाणपत्र ऑनलाइन करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांना नोंदणी करण्यास सांगितले होते. ३१ ऑक्टोबरला त्याची अंतिम मुदत असतानाही राज्यात शंभरही डॉक्टरांकडून नोंदणी झाली नाही. या नोंदणीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवल्याने हे प्रमाणपत्र ऑनलाइन होणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

परिवहन खात्याने दलाल संस्कृती संपवण्यासह पारदर्शी कामाच्या नावाने वाहन चालवण्यासाठी शिकाऊ परवाना आता घरबसल्या उपलब्ध केला आहे.

 परंतु चाळिशीनंतरच्या व्यक्तींना वाहन चालवण्याचा परवाना नूतनीकरणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागले. सोबत जड वाहन अथवा मालवाहू वाहने चालवण्याच्या परवान्यासाठीही आरटीओ कार्यालयांत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्राच्या वैधतेवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. काही सामाजिक संघटनेकडून दलालांकडे डॉक्टरांचे बनावटी शिक्के राहात असल्याने ते मारून बोगस प्रमाणपत्रावर विविध आरटीओची कामे केली जात असल्याचाही आरोप होतो. दरम्यान, परिवहन खात्याने या कामात पारदर्शीपणा आणण्यासाठी ऑनलाइन प्रमाणपत्र लागू करण्याचे निश्चित केले आहे.

हे ऑनलाइन प्रमाणपत्र देण्याची मुभा परिवहन खात्याच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या डॉक्टरांनाच मिळणार आहे. हे डॉक्टर एमबीबीएस असणे आवश्यक आहे. सोबत एका डॉक्टराला रोज वीसहून अधिक वैद्यकीय प्रमाणपत्र देता येणार नाही. या डॉक्टरांना ऑनलाइन वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी परिवहन खात्याच्या संकेतस्थळावर एक आयडी आणि पासवर्ड उपलब्ध केला जाईल. त्यावरच त्याला हे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्राची बनावटगिरी संपण्याची आशा व्यक्त होत होती.

डॉक्टरांकडून ही नोंदणी व्हावी म्हणून परिवहन खात्याकडून ऑगस्ट २०२१ पासून प्रयत्न होत आहेत, परंतु डॉक्टरांकडून प्रतिसाद नाही. आता ३१ ऑक्टोबरला या नोंदणीची अंतिम मुदत आहे,

परंतु अद्याप राज्यात शंभरही डॉक्टरांकडून परिवहन खात्याकडे नोंदणी केली गेली नाही. त्यामुळे परिवहन खात्यावर या नोंदणीला मुदतवाढ देण्याची पाळी येण्याची शक्यता आहे.

उपराजधानीत एकाचीच नोंद

नागपूर शहर आरटीओ कार्यालयात तूर्तास केवळ एकाच डॉक्टराकडून ऑनलाइन वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी नोंद केली गेली आहे. तर एका डॉक्टरकडून लवकरच नोंद होणार असल्याचे नागपूर शहरातील प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख यांनी सांगितले. परंतु लवकरच हा प्रतिसाद वाढण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात तूर्तास शंभरच्या जवळपास एमबीबीएस डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. ही संख्या खूपच कमी असून ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘आरटीओ’च्या पारदर्शी वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रयत्नासाठी राज्यभऱ्यातील डॉक्टरांनी पुढे येऊन परिवहन विभागाला मदत करावी. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून परिवहन खाते काळजी घेईल.

– डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Doctors neglect registration with rto department in nagpur zws

Next Story
प्रशासनाची कुंभकर्णी झोप कधी संपणार?
ताज्या बातम्या