ठाण्याची टोळी गजाआड; एक पुरुषासह चार महिलांचा समावेश

नवनवीन मुली व महिलांसोबत रात्र घालवून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या ठाणे येथील टोळीला गजाआड करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील पाच सदस्यांमध्ये चार महिलांचा समावेश असून पुरुष आरोपी हा मुख्य सूत्रधार आहे.

रितेश ऊर्फ भेरूलाल भगवानलाल चामार (३४) रा. कारवडवली, घोडबंदर, ठाणे, सुवर्णा मिनेश निकम (३३) रा. नेरुळ, नवी मुंबई, पल्लवी विनायक पाटील (२१) रा. वाडा, ठाणे, शिल्पा समीर सरवटे (५२) रा. डोंबिवली मुंबई आणि निशा सचिन साठे (२४) रा. येरवडा, पुणे अशी आरोपींची नावे आहेत. रितेश याने ठाणे येथे निशा फ्रेंडशीप क्लब नावाने कार्यालय सुरू केले होते. तेथून तो बनावट सीमकार्डच्या माध्यमातून महिलांना कॉल सेंटरच्या नावाने नोकरीवर ठेवायचा. त्यानंतर तो राज्यभरातील विविध मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांना तरुण मुलींशी मैत्री करणे, त्यांच्यासोबत मौजमजा करणे, पैसा कमवण्यासाठी महिलांमार्फत फोन करायचा. एखाद्याने इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याच्याकडून नोंदणीशुल्क एक हजार रुपये आणि त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून पैसे उकळायचा.

गेल्या सात-आठ वर्षांपासून हा त्यांचा गोरखधंदा सुरू होता. काही वर्षांपूर्वी असाच भ्रमणध्वनी उपराजधानीतील एकाला आला. त्याला प्लेबॉयची नोकरी, डॉक्टर, एअरहोस्टेश, अभियंता असलेल्या सुंदर स्त्रियांसोबत रात्र घालवून दररोज २० हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवण्यात आले व त्याच्याकडून आतापर्यंत १ लाख २६ हजार ६०० रुपये उकळले होते. हे पैसे त्याने पत्नीचे दागिने तारण ठेवून भरले होते. मात्र, त्याच्या हाती काहीच आले नाही. त्यामुळे तो नैराश्यात होता. एक दिवस आत्महत्या करण्याच्या विचारात असताना त्याच्या पत्नीने त्याच्याशी चर्चा केली असता हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदीपन पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक उल्हास भुसारी, मनोज ओरके, मनीष हिवरकर, राजू डांगे, अरुण खोरगडे, संदीप बेलसरे, शालिकराम शेंडे, भूषण उद्धार, विद्याधर पवनीकर, रोशन चौधरी, पवन लांबट, किरण, उज्ज्वला आणि दीपक यांनी तपास करून आरोपींना मुंबई, ठाणे व पुण्यातून अटक केली. आरोपींना २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त रवींद्र कापगते उपस्थित होते.

४५ ते ६० वयोगटातील पुरुष ग्राहक अधिक

आरोपींनी आतापर्यंत हजारो लोकांना गंडवले आहे. एका ग्राहकामागे रितेश संबंधित महिलेला २० टक्के कमिशन देत होता. आरोपी महिला स्वत:च्या घरांमधून ग्राहकांना भ्रमणध्वनी करायचे. मात्र, बँक खात्यांचे एटीएम रितेशकडे होते. त्यांच्याकडून २८ एटीएम कार्ड, २५ सीमकार्ड, लॅपटॉप व दोन सीपीयू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आतापर्यंत आरोपींनी ४५ ते ६० वयोगटातील पुरुषांनाच अधिक फसवल्याची माहिती समोर आली. त्यात नागपुरातील ७ ते ८ जणांचा समावेश आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.