नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे करोनामुळे निधन झाले असल्यास त्यांचा शैक्षिणक खर्च विद्यापीठाकडून करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, विद्यापीठाकडे यासाठी अर्ज करूनही पालकांचे छत्र हरपलेले अनेक विद्यार्थी लाभापासून वंचित असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. 

नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचा समावेश होतो. येथील जवळपास पाचशे महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित असून सहा लाखांच्या घरात विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृतांची संख्या ही मोठी होती. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे करोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा खर्च कसा करावा, असा प्रश्न होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे वडील, आई किंवा पालकांचे करोनामुळे निधन झाले असेल त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, असा प्रस्ताव विधिसभेमध्ये देण्यात आला होता. त्यावर व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा करून हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे करोनामुळे निधन झाले असेल त्याचा खर्च विद्यापीठ करणार, असा निर्णय झाला. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अनेक अर्जदार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार आहे.

बहीण-भावासमोर अडचण

हिंगणा परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थ्यांने सांगितले की, करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या वडिलांचे निधन झाले. सध्या त्याची बहीण आणि तो दोघेही विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने सांगितल्यानुसार त्यांनी अर्जही केले. मात्र, त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. उलट महाविद्यालय त्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी जबरदस्ती करीत आहे. यासंदर्भात कुलगुरू आणि अन्य अधिकाऱ्यांशी भेट घेतली असता काही तांत्रिक अडचणीमुळे यात अडसर येत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक खर्च कुठून करावा असा प्रश्न पडला आहे.