यवतमाळ : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यास संधी मिळाली आहे. त्यामुळे नुकत्याच बहुमतात आलेल्या महायुतीच्या होवू घातलेल्या सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. यात शिवसेनेचे संजय राठोड, भाजपचे प्रा. डॉ. अशोक उईके, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे इंद्रनील नाईक यांची नावे चर्चेत आहे.

दिग्रस विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आलेले संजय राठोड हे शिवसेना (शिंदे) कडून विदर्भातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहे. राठोड यांनी यापूर्वी युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री, महाविकास आघाडीत वनमंत्री आणि महायुती सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि जलसंधारण मंत्री म्हणून काम केलेले आहे. महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या बंजारा समाजाचे नेतृत्व करत असल्याने संजय राठोड हे जातीय समीकरणांच्या आधारावरही मंत्रिपदाचे दावेदार ठरत असल्याने यावेळी त्यांना पहिल्या शपथविधीत समारोहातच संधी मिळेल आणि अधिक चांगल्या मंत्रालयाची जबाबदारी मिळेल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – फडणवीसांचा मुक्काम ‘रामगिरी’ला की ‘देवगिरी’ला ?

भाजपचे प्रा. डॉ. अशोक उईक हे राळेगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर गेले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये युती सरकारमध्ये ते शेवटचे तीन महिने आदिवासी विकासमंत्री राहिले आहे. भाजपमध्ये विदर्भातील आदिवासी समाजाचा चेहरा म्हणून डॉ. अशोक उईके यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे पुसद येथील युवा आमदार इंद्रनील नाईक हे सर्वाधिक मताधिक्याने दुसऱ्यांदा निवडून आले आहे. नाईक घराण्यात २००९ पर्यंत मंत्रिपदाची परंपरा कायम राहिली आहे. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईक कुटुंबीयातील कोणीही गेल्या १० वर्षांत मंत्री झाले नाही. त्यामुळे यावेळी महायुती सरकारमध्ये इंद्रनील नाईक यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातून ही तीन नावे चर्चेत असली तरी महायुतीच्या छप्परफाड यशामुळे तिन्ही पक्षांसमोर कोणाला संधी द्यायची हा प्रश्न असून, पक्षांतर्गत स्पर्धाही वाढली आहे. यवतमाळात पक्षांतर्गत स्पर्धा नसल्याने आमदार राठोड, उईके आणि नाईक या तिघांचेही समर्थक आपला नेता शंभर टक्के मंत्री होईल, असा दावा करत आहेत.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १६ जागी मताधिक्‍य, विधानसभेत मात्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राठोड उपमुख्यमंत्री व्हावे यासाठी ‘अरदास’

महाराष्ट्रातील दीड कोटी बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी बंजारा समाजातील विविध संघटनांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नाईकनगर तांड्यावर संत सेवालाल महाराज मंदिरात ‘अरदास’ करून संजय राठोड उपमुख्यमंत्री व्हावे म्हणून प्रार्थना करण्यात आली. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.