अकोला: मुली व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. दररोज कुठे ना कुठे महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील एका अल्पवयीन मुलीला अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन नराधमाने तब्बल दोन वर्ष वारंवार अत्याचार केला. अखेर पीडित मुलीला सहन न झाल्याने तिने पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कथन केला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पिंजर आणि चान्नी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत आरोपीला गजाआड केले.
अनेक वेळा मुलींना एकटे गाठून नराधम आरोपी त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अश्लील छायाचित्र, चित्रफित याच्या आधारे मुलींना ‘ब्लॅकमेल’ करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यातून अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांचे शोषण होण्यासारख्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. याच प्रकारची एक संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेचे दोन वर्ष सातत्याने शोषण केले. पातूर तालुक्यातील अंधारसांगवी सुनील गजानन देवकर (२५) हा २०२२ च्या डिसेंबरपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. त्याने एक दिवस दुचाकीवरून मुलीला जबरदस्तीने महान धरणाजवळील वाघागड येथील जंगलात नेले. मुलीने प्रचंड विरोध केल्यानंतर देखील त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने तिला गावात सोडले. ‘घडलेल्या प्रकारासंदर्भात कुणाला काही सांगितले, तर काढलेले अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर टाकून बदनामी करेल,’ अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. त्यामुळे पीडिता घाबरुन गप्प राहिली.
आरोपी मित्रांसह पीडितेच्या शाळेजवळ येत होता आणि तिचे अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार करीत होता. यासर्व प्रकरामुळे पीडितेवर मोठे मानसिक दडपन आले होते. आरोपी पीडितेला दोन वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास देत राहिला. अखेर आरोपीचे अत्याचार सहन न झाल्याने अल्पवयीन पीडित मुलीने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. मुलीच्या तक्रारीवरून पिंजर पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. नराधम आरोपी चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंजर व चान्नी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.