नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ मध्ये पुण्यातील रमेश खरमाळे यांचे कौतुक केले आणि त्यानंतर हे रमेश खरमाळे चर्चेत आले. ते स्वत:च नाही तर त्यांचे संपूर्ण कुटूंबिय पर्यावरणाची सेवा करतात. आठवड्याच्या अखेरीस ते कुटूंबियांसह जुन्नरच्या टेकड्यांचे पुनरुज्जीवन करण्यात वेळ घालवतात.
ते खड्डे खणतात, ते झाडेही लावतात आणि त्यांच्यामुळेच एक ऑक्सिजन देणारे उद्यान देखील तयार झाले आहे. पर्यावरणाच्या अविरत सेवेमुळे याठिकाणचे पक्षी आणि वन्यजीवांचा अधिवास पुनर्जिवीत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची ही कहाणी ‘मन की बात’ म्हणून शेअर केली.
पुण्यातील रमेश खरमाळे हे नेहमीच त्यांच्या कुटुंबासह जुन्नरच्या डोंगरांवर जातात. तिथले वाळलेले गवत, झुडपे काढून नवीन खड्डे करुन त्यात बियाणे पेरतात. एवढेच नाही तर डोंगरावरुन पाणी वाहून जाऊ नये यासाठी पाणवठे देखील तायर करतात. अवघ्या दोन महिन्यात त्यांनी ७० खंदक तयार करुन असंख्य तलाव देखील निर्माण केले आहे. ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड केल्यामुळे त्याठिकाणी ऑक्सिजन पार्क तयार झाले आहे आणि पक्षी पुन्हा त्याठिकाणी परत येत आहे.
एवढेच नाही तर वन्यजीवांचा देखील वावर आढळून येत आहे. रमेश खरमाळे यांचे वय ४९ वर्षे असून ते माजी सैनिक आहेत. आधी देशाची आणि आता पर्यावरणाची ते सेवा करत आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुंबासह पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील एका टेकडीचे पुनरुज्जीवन केले. जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील खरमाळे यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आणि २०१२ मध्ये निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर त्यांनी दोन वर्षे बँकेत काम केले, परंतु नोकरीत ते समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी जुन्नरमध्येच एक अकादमी सुरू केली. या अकादमीच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित केले. तिथेही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वनखात्याची परीक्षा दिली आणि वनरक्षक म्हणून ते कामाला लागले. जुन्नर शहराजवळील वडज या गावात रमेश खरमाळे यांनी सक्रिय जनसहभागातून ऑक्सिजन पार्क तयार केला आहे.
या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावली. ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या कार्याची दखल घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. खरमाळे पावसाचे पाणी साठविण्यासाठी डोंगरावर खंदक खोदतात. तर त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे शिवाजी महाराजांच्या काळातील जुन्या पायऱ्यांच्या विहिरींमधून अनावश्यक गवत काढून मदत करतात. त्यांची मुले, मयुरेश आणि वैष्णवी, नवीन खोदलेल्या खड्ड्यात बिया टाकण्याचे काम करतात.