नागपूर : नागपूर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयमधील प्राध्यापक डॉ. सारंग धोटे व त्यांच्या टीमने नवीन यशस्वी उपक्रम राबवला आहे. नायजेरिया येथील लागोस स्टेट युनिव्हर्सिटीमधील झाडे त्यांनी बोलकी केली आहेत.लागोस स्टेट युनिव्हर्सिटी (LASU), नायजेरिया येथे दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी ‘टॉकिंग ट्री’ स्मार्टफोन अप्लिकेशनचे यशस्वी लोकार्पण करण्यात आले. नायजेरियामधील अशा प्रकारचा स्मार्टफोन अप्लिकेशन असलेली लागोस स्टेट युनिव्हर्सिटी ही पहिली संस्था ठरली आहे. हे अप्लिकेशन श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, नागपूर, भारत आणि लागोस स्टेट युनिव्हर्सिटी, नायजेरिया येथील वनस्पतिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित करण्यात आला आहे.

या अनोख्या अप्लिकेशनच्या माध्यमातून झाडांना QR कोड स्टिकर्स लावले जातात. हे QR कोड ‘टॉकिंग ट्री’ स्मार्टफोन अप्लिकेशनद्वारे स्कॅन केल्यावर झाड स्वतःची माहिती इंग्रजी तसेच नायजेरियाची स्थानिक भाषा योरुबा यामध्ये वापरकर्त्यांना व हितधारकांना देते. हे अप्लिकेशन ऑफलाईनही कार्यक्षम असून, गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच, हे अप्लिकेशन कोणत्याही डिव्हाइसवर कार्य करते.

हेही वाचा…वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनी चोरले मृत वाघाचे अवयव; उकणी खाणीतील घटना, आरोपींना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अप्लिकेशनचे लोकार्पण लागोस स्टेट युनिव्हर्सिटीच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचे मार्गदर्शन डॉ. सारंग धोटे (शिवाजी विज्ञान महाविद्यालय , नागपूर) आणि डॉ. इवेकये टोलुलोप सेउन (सिनियर लेक्चरर, वनस्पतिशास्त्र विभाग, लागोस स्टेट युनिव्हर्सिटी, नायजेरिया) यांनी केले. डॉ. सारंग धोटे हे ‘टॉकिंग ट्री’ अप्लिकेशनचे जनक म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी दोन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना अप्लिकेशन तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. लोकार्पण सोहळ्याच्या वेळी डॉ. इवेकये टोलुलोप सेउन यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “या अप्लिकेशनमुळे स्थानिक भाषेत माहिती मिळणे ही एक मोठी उपलब्धी आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण शिक्षणाला एक नवीन दिशा मिळेल. लागोस स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक कबीरु ओलुसेगुन अकिंयेमी यांनीही या महत्त्वपूर्ण यशाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.