करोनामुळे आगारात रुतून बसलेली लालपरी गुरुवारपासून पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या प्रवासी वाहतूक सेवेला पहिल्या दिवशी कमी प्रतिसाद लाभला. करोना संसर्गाची अजूनही प्रवाशांमध्ये धास्ती असल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले.
पाच महिन्यांपासून आगारात विसावलेली लालपरी गुरुवारपासून आंतरजिल्हा प्रवास सेवेसाठी सज्ज झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंतरजिल्हा प्रवासी बस सेवेला मान्यता मिळताच प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस), ठक्कर बजार, मुंबई नाका या बस स्थानकातून पहिल्या दिवशी पुणे, मुंबई, बोरिवली, औरंगाबाद, धुळे, कसारा या मार्गावर शिवशाही, निमआराम आणि साध्या बसगाडय़ा धावल्या. जुने सीबीएस आणि ठक्कर बजार (नवीन सीबीएस) स्थानकात प्रवाशांची बऱ्यापैकी गर्दी झाली. प्रवाशांना या वेळी राज्य परिवहन महामंडळाकडून करोनापासून बचाव करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत, त्याविषयी माहिती देण्यात आली. बस स्थानके खबरदारीचा उपाय म्हणून विशिष्ट कालावधीत निर्जंतुक करण्यात येत होते. तसेच ध्वनिक्षेपकावरून सातत्याने प्रवाशांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी सूचना करण्यात येत होत्या. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी गावी जाण्यासाठी बस स्थानक गाठले. बसमध्ये ५० आसन क्षमता असताना करोनाच्या पार्श्वभूमीवर के वळ २२ प्रवाशांनाच बसविण्यात येत होते. प्रवाशांना मुखपट्टी बंधनकारक करण्यात आली. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विविध मार्गावरही बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले.