नाशिक – युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेले साल्हेर जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होण्यासाठी संपूर्ण पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. साल्हेर किल्ला तसेच बागलाण परिसरात पुढील काळात विविध कामे केली जातील. त्याकरिता राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी साल्हेरसह बागलाण तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
युनेस्कोने नुकतीच नवीन वारसास्थळांची यादी घोषित केली. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लक्षवेधी ठरलेल्या १२ किल्ल्यांचा वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात बागलाण तालुक्यातील साल्हेरचा समावेश आहे. यामुळे साल्हेरसह बागलाण तालुक्याच्या पर्यटनासाठी नवीन दालन खुले झाले आहे.
साल्हेरचा या यादीत समावेश होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीपासून वैयक्तिक लक्ष दिले. यामुळे साल्हेरचा समावेश होण्यात मोलाची मदत झाल्याची भावना व्यक्त करीत आमदार बोरसेंनी त्यांचे आभार मानले. युनेस्को, केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून साल्हेरसह तालुक्यात विविध विकास कामे व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी, बागलाण परिसरात आगामी काळात विविध कामे साकार होणार असल्याचे सांगितले. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. आपल्या कल्पनेतील काही कामांचे प्रस्ताव असतील तर त्यांचे अहवाल, आराखडे सादर करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, आ. राहुल ढिकले, कळवणचे आमदार नितीन पवार आदी उपस्थित होते.