लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे १२ जानेवारी रोजी आयोजित नवव्या राष्ट्रीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५’ शर्यतीचे विजेतेपद मुंबई येथील डॉ. कार्तिक करकेरा याने पटकावले. कार्तिकने ४२.१९५ किलोमीटर अंतर २ तास २० मिनिटात पूर्ण करुन या मॅरेथॉनमधील नवा विक्रम आपल्या नावावर केला. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमारने २ तास २६ मिनिटे ०१ सेकंद या वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली होती.

कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून नवव्या राष्ट्रीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५’ आणि १४ व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉनला सुरुवात झाली. धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुख्य मॅरेथॉनव्यतिरिक्त वेगवेगळ्या १४ गटांमध्ये झालेल्या शर्यतीत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत धावपटूंनी सहभाग नोंदविला. भारतीय हॉकी संघातील खेळाडू तथा रियो ऑलिम्पिकपटू रेणुका यादव या प्रमुख पाहुण्या होत्या. आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी आदींसह इतर संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

आणखी वाचा-भुजबळांविषयी न बोलण्याचा माणिक कोकाटे यांना अजित पवार गटाचा आदेश

डॉ. कार्तिकने २ तास २० मिनिटे अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सिकंदर तडाखे या धावपटूने २ तास २० मिनिटे २ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकाचे एक लाख रुपयांचे तर, वर्धा जिल्ह्यातील विक्रम बंगरिया या धावपटूने २ तास २० मिनिटे १२ सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकाचे ७५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

मॅरेथॉनसाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण साडेतीन हजारापेक्षाही जास्त धावपटू सहभागी झाले होते. मुख्य मॅरेथॉनमधील विजेते पहिले तिन्ही धावपटू हे महाराष्ट्रातील आहेत. नाशिकच्या सिकंदर तडाखेने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दुसरा क्रमांक कायम ठेवत मागील वर्षीपेक्षा यंदा सहा मिनिटे २१ सेकंद अशी कमी वेळ घेत स्वतःचाच विक्रम मोडला.

आणखी वाचा-मंत्री नरहरी झिरवळ यांचे विद्यार्थ्यांसह मुंबई दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मविप्र मॅरेथॉनमध्ये यंदा प्रथमच खेळाडूंच्या पाठीवर बीब क्रमांक (आरएफ आयडी टॅग) लावण्यात आला. या माध्यमातून धावपटूला शर्यत किती वेळात पूर्ण केली याची अचूक माहिती त्वरित भ्रमणध्वनीवर मिळण्यास मदत झाली.गेल्या वर्षीच्या तुलनेत बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली. मॅरेथाॅनला गंगापूर रस्त्यावरील मॅरेथॉन चौकापासून सुरुवात झाली. जुना गंगापूर नाका-आनंदवली- सोमेश्वर- हॉटेल गंमत जंमत- दुगाव फाटा- गिरणारे-धोंडेगाव आणि परत मविप्र मॅरेथॉन चौक असा मॅरेथॉनचा मार्ग होता.