नाशिक – महायुती सरकारमधील भरत गोगावले, नितेश राणे, संजय शिरसाट अशा काही मंत्र्यांची छायाचित्रे झळकवत शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने सोमवारी जनआक्रोश आंदोलनातून महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रस्त्यावर प्रतिकात्मक पत्त्याचा डाव मांडून माणिक कोकाटे यांचाही निषेध करण्यात आला. महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांबाबत तिन्ही पक्षांचे पक्षांचे प्रमुख गप्प का, असा प्रश्न करीत संबंधितांचे राजीनामे घेण्याची मागणी करण्यात आली.

महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात ठाकरे गटातर्फे शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते. महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महायुती सरकारमधील बहुसंख्य मंत्री भ्रष्ट असून त्यांनी महाराष्ट्राचे नाव कलंकित केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अनेक वादग्रस्त मंत्र्यांची छायाचित्रे झळकविण्यात आली. महायुती सरकारमधील मंत्री आपले कर्तव्य पार पाडण्यात विफल ठरले. त्यांंच्याकडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न होत आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

काही आंदोलकांनी माणिक कोकाटे यांच्या निषेधार्थ रस्त्यावर प्रतिकात्मक रमीचा डाव मांडला. शिंदे गटातील एक मंत्री डान्सबार चालवतो, एक खाद्यगृहात कर्मचाऱ्यांना मारहाण करतो. एक हॉटेलच्या खोलीत पैशांची बॅग घेऊन बसतो. भाजपचा एक मंत्री धार्मिक तेढ निर्माण करतो, याकडे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

दिंडे-पांडे दुरावा कायम

आंदोलनावेळी ठाकरे गटातील संपर्कप्रमुख जयंत दिंडे आणि राज्य संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे यांच्यातील दुरावा अधोरेखीत झाला. अलीकडेच एका बैठकीत विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्यावरून उभयतांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे माजी महापौर पांडे हे आंदोलनात सहभागी होतील की नाही, याबद्दल साशंकता होती. पांडे यांनी आंदोलनात हजेरी लावली. परंतु, दिंडे यांच्याशी कुठलाही संवाद साधता नाही. दिंडे यांनीही पांडेंशी संवाद साधला नाही. या संदर्भात पांडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे पक्षाचे आंदोलन होते, असे स्पष्ट केले. दिंडे यांना गरज असेल तर ते संवाद साधतील, असे त्यांनी म्हटले आहे.