जळगाव – जिल्ह्यातील प्रवाशांना दुपारच्या वेळी नाशिक जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित मेमू रेल्वेला पुढील तीन महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी आता ३० सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून ०१२११ बडनेरा- नाशिक रोड आणि ०१२१२ नाशिक रोड- बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वेला यापूर्वी ३० जूनपर्यंत चालवण्याची सूचना होती. नवीन सूचनेनुसार, सदरची गाडी आता एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालविण्यात येणार आहे. या कालावधीत गाडीच्या एकूण ९२ फेऱ्या होतील. बडनेरा ते नाशिक रोड स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वेला जळगाव जिल्ह्यातील बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव येथे थांबा देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुसावळ ते देवळाली आणि भुसावळ ते इगतपुरी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त मधल्या वेळेत एकही गाडी नाशिक जाण्यासाठी यापूर्वी नव्हती. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने स्थानिक प्रवाशांचे खूप हाल होत असत. मात्र, बडनेरा- नाशिक रोड या मेमू रेल्वेमुळे दुपारच्या वेळी साडेतीनच्या सुमारास हक्काची गाडी उपलब्ध झाल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय अलिकडच्या काळात झाली आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दर तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्यापेक्षा ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.